MPs suspensions : 92 विरोधी खासदारांचे संसदेच्या हिवाळी अधिवेशन समाप्तीपर्यंत निलंबन | पुढारी

MPs suspensions : 92 विरोधी खासदारांचे संसदेच्या हिवाळी अधिवेशन समाप्तीपर्यंत निलंबन

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : MPs suspensions : संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणात गृहमंत्री अमित शहांच्या निवेदनासाठी गोंधळ घालणाऱ्या विरोधकांवर आज निलंबनास्त्र चालले. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये गैरवर्तनाचा ठपका ठेवून पिठासीन अधिकाऱ्यांनी आज तब्बल 78 खासदारांना निलंबित केले. यात लोकसभेतील 33 तर राज्यसभेतील 45 खासदारांचा समावेश आहे.

मागील आठवड्यात दोन्ही सभागृह मिळून 14 खासदार (लोकसभेतील 13 आणि राज्यसभेतील 1) निलंबित झाले होते. त्यानंतर आज 78 खासदारांचे निलंबन झाले आहे. अशाप्रकारे विरोधी बाकांवरील तब्बल 92 खासदारांची संसदेतून हिवाळी अधिवेशन समाप्तीपर्यंत गच्छंती झाली आहे. त्यातही दोन्ही सभागृहांमध्ये सर्वोच्च आसनाचा अनादर केल्याबद्दल लोकसभेतील तीन आणि राज्यसभेच्या अकरा खासदारांवर हक्कभंगाच्या कारवाईची शिफारस देखील झाली आहे.

लोकसभेमध्ये आज 33 खासदारांना निलंबित करण्यात आले. त्यात कॉंग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी, द्रमुकचे गटनेते टी. आर. बालू, माजी मंत्री ए. राजा, दयानिधी मारन यांचा समावेश होता. तसेच, लोकसभेचे कामकाज सुरू असताना अध्यक्षीय आसनाशेजारी जाऊन उभे राहणारे विजय वसंत, अब्दुल खालिक आणि के. जयाकुमार या तीन खासदारांविरुद्ध हक्कभंग कारवाईची शिफारस झाली. लोकसभेत पिठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल यांनी विरोधी खासदारांच्या गैरवर्तनाचा नावानिशी उल्लेख केल्यानंतर संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी 33 खासदारांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला. तसेच विजय वसंत, अब्दुल खालिक आणि के. जयाकुमार यांच्याविरुद्ध हक्कभंग कारवाईचाही प्रस्ताव मांडला. यावर सभागृहाने आवाजी मतदानाने शिक्कामोर्तब केले. (MPs suspensions)

लोकसभेमध्ये आज सकाळपासूनच कामकाज विस्कळीत राहिले. गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेतील सुरक्षा भंगावर निवेदन द्यावे अशी मागणी करणाऱ्या विरोधकांना लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी या घटनेवर राजकारण केले जात आहे”, अशा शब्दात लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी फटकारले. मात्र, विरोधकांची घोषणाबाजी सुरूच राहिल्याने प्रथम दुपारी बारापर्यंत आणि त्यानंतर दुपारी दोनपर्यंत लोकसभेचे कामकाज तहकूब झाले. दुपारी दोनला विरोधकांनी, संसदेतील घुसखोरांना पास देणाऱ्या भाजप खासदाराच्या अटकेची मागणी करताना अध्यक्षांपुढील हौद्यात उतरून कागद भिरकावले. त्यावेळी अब्दुल खालिक, विजय वसंत आणि के. जयाकुमार हे खासदार अध्यक्षीय आसनात असलेले पिठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल यांच्या शेजारी जाऊन उभे राहिले होते.

दरम्यान, वरिष्ठ सभागृह राज्यसभेमध्येही प्रचंड गदारोळ झाला. विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या खासदारांनी सभापती जगदीप धनकड यांच्या आसनासमोर येऊन जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे कामकाजात वारंवार अडथळे येऊन पिठासीन अधिकाऱ्यांना सभागृह तीनवेळा वेळा तहकूब करावे लागले. दुपारी चारला सभागृह सुरू झाल्यानंतर सभापती जगदीप धनकड यांनी विरोधी पक्षांच्या खासदारांच्या वर्तनाबद्दल कठोर शब्दात नाराजी व्यक्त केली. बरेच खासदार जाणीवपूर्वक सभापतींच्या आसनाची अवहेलना करत असल्याचा ठपका जगदीप धनकड यांनी ठेवला. जनतेच्या अपेक्षांची आणि भावनांची दखल घेतली जात नसल्याने शरमेने आपली मान खाली गेली आहे, असा उद्वेगही सभापतींनी व्यक्त केला. विरोधी बाकांवरील ४५ खासदारांना निलंबित करण्यात आले. त्यातील ११ जणांविरुद्ध हक्कभंग कारवाईची शिफारस करण्यात आली आहे.

लोकसभेतील निलंबित खासदार (MPs suspensions)

ए. राजा, दयानिधी मारन, टी. आर. बालू, जी. सेल्वम, सी. एन. अन्नादुराई, डॉ. टी. सुमती, के. वीरस्वामी (सर्व द्रमुक), कल्याण बॅनर्जी, सौगत रॉय, शताब्दी रॉय, अपरुपा पोद्दार, प्रसून बॅनर्जी, असित कुमार मल, काकोली घोष दस्तिदार (सर्व तृणमूल कॉंग्रेस), ई. टी. मोहम्मद बशीर, के. नवास कानी (दोघेही मुस्लिम लिग), एन. के. प्रेमचंद्रन (आरएसपी), कौशलेंद्र कुमार (संयुक्त जनता दल), कॉंग्रेस गटनेते, अधीर रंजन चौधरी, एन्टो एन्टोनी, के. जयाकुमार, विजय वसंत, गौरव गोगोई (सर्व कॉंग्रेस), एस. एस. पलानीमनिक्कम, अब्दुल खालिक, तिरुवुक्करसर, प्रतिमा मंडल, के. मुरलीधरन, सुनीलकुमार मंडल, ए. रामलिंगन, के. सुरेश, अमरसिंह, राजमोहन उन्निथन.

हक्कभंगाची कारवाई ओढवून घेणारे खासदार : अब्दुल खालिक, विजय वसंत, के. जयाकुमार

राज्यसभेतील निलंबित 34 खासदार

राज्यसभेत काँग्रेसचे उपनेते प्रमोद तिवारी, जयराम रमेश, डॉ. एमी याज्ञिक, नारनभाई जे. राठवा, सय्यद नासिर हुसेन, फुलो देवी नेताम, शक्तीसिंह गोहिल, के. सी. वेणुगोपाल, रजनी अशोकराव पाटील, रंजित रंजन, इम्रान प्रतापगढ़ी, रणदीप सिंग सुरजेवाला, सुखेंदू शेखर राय, मोहम्मद नदीमुल हक, अबीर रंजन बिस्वास, डॉ. शंतनू सेन, मौसम नूर, प्रकाश चिक बराईक, समीरुल इस्लाम, एम. षणमुगम, एन. आर. एलांगो, डॉ. कनिमोझी एनव्हीएन सोमू, आर. गिरीराजन, मनोजकुमार झा, डॉ फैयाज अहमद, डॉ. व्ही. शिवदासन, रामनाथ ठाकूर, अनिल प्रसाद हेगडे, वंदना चव्हाण, राम गोपाल यादव, जावेद अली खान, महुआ माझी, जोस के. मणी, अजित कुमार भुयान.

हक्कभंगाची कारवाई ओढवून घेणारे 11 खासदार : श्रीमती जे बी माथेर हिशाम, डॉ. एल. हनुमंतय्या, नीरज डांगी, राजमणी पटेल, कुमार केतकर, जी. सी. चंद्रशेखर, बिनॉय विश्वम, संतोष कुमार पी., एम. मोहम्मद अब्दुल्ला, डॉ जॉन ब्रिटास आणि ए. ए. रहीम

मागील आठवड्यात निलंबित झालेले 14 खासदार

लोकसभा : टी एन प्रतापन, हायबी इडन, ज्योतीमणी, डीन कुरियाकोस, रम्या हरदास, कनिमोझी, मणिकम टागोर, एस. वेंकटेशन, पी. आर. नटराजन, बेनी बेहानन, के. सुब्रमण्यन, मोहम्मद जावेद, व्ही. के. श्रीकंदन

राज्यसभा : डेरेक ओ ब्रायन

Back to top button