Stock Market Closing Bell | शेअर बाजारात नफा वसुली! सेन्सेक्स ७१,३१५ वर बंद, नेमकं काय घडलं? | पुढारी

Stock Market Closing Bell | शेअर बाजारात नफा वसुली! सेन्सेक्स ७१,३१५ वर बंद, नेमकं काय घडलं?

पुढारी ऑनलाईन : आशियाई बाजारातील कमकुवत संकेतांमुळे सावध सुरुवात झालेल्या शेअर बाजारात आज सोमवारी (दि.१८) नफा वसुली दिसून आली. आज सेन्सेक्स आणि निफ्टीच्या ३ सत्रांतील विक्रमी तेजीला ब्रेक लागला. सेन्सेक्स १६८ अंकांनी घसरून ७१,३१५ वर बंद झाला. तर निफ्टी ३८ अंकांच्या किरकोळ घसरणीसह २१,४१८ वर स्थिरावला.

क्षेत्रीय पातळीवर फार्मा निर्देशांक १ टक्‍क्‍याने, कॅपिटल गुड्स निर्देशांक ०.७ टक्‍क्‍यांनी वाढला, तर रियल्टी निर्देशांक १ टक्के आणि बँक निर्देशांक ०.५ टक्‍क्‍यांनी घसरला. बीएसई मिडकॅप ०.३ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.५ टक्क्यांनी वधारला. बाजाराला आज रिलायन्स, विप्रो, एचसीएल टेक आणि टीसीएस सारख्या हेवीवेट स्टॉक्समधील खरेदीमुळे काही प्रमाणात सपोर्ट मिळाला.

संबंधित बातम्या 

सेन्सेक्सवर काय स्थिती?

सेन्सेक्स आज ७१,४३७ वर खुला झाला होता. सेन्सेक्सवर पॉवर ग्रिड, जेएसडब्ल्यू स्टील, आयसीआयसीआय बँक, आयटीसी, इन्फोसिस, इंडसइंड बँक हे शेअर्स घसरले. तर सन फार्मा, रिलायन्स, बजाज फायनान्स, एचसीएल टेक, टायटन, एशियन पेंट्स हे शेअर्स वाढले. (Stock Market Closing Bell)

निफ्टीवर कोण टॉप लूजर्स, टॉप गेनर्स?

निफ्टी ५० वर पॉवर ग्रिड, आयसीआयसीआय बँक, जेएसडब्ल्यू स्टील, आयटीसी, ओएनजीसी हे शेअर्स टॉप लूजर्स ठरले. हे शेअर्स १ ते २.३४ टक्क्यांपर्यंत घसरले. तर बजाज ऑटो, हिंदाल्को, अदानी पोर्ट्स, सन फार्मा, बजाज फायनान्स हे शेअर्स टॉप गेनर्स होते. हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांपर्यंत वाढले.

निफ्टी आणि सेन्सेक्स या महिन्यात मजबूत राहिले आहेत. आतापर्यंत या निर्देशांकांनी सुमारे ६ टक्क्यांनी वाढ नोंदवली. निफ्टीने ११ सत्रांपैकी ९ सत्रांमध्ये विक्रमी उच्चांक गाठला. निफ्टीची ही २०२३ मधील सर्वाधिक प्रभावी कामगिरी आहे.

परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांची महत्त्वाची भूमिका

दरम्यान, विशेषतः परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांचे (FPIs) बाजारातील वाढीमध्ये लक्षणीय योगदान राहिले आहे. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीच्या आकडेवारीनुसार, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात ४२,७३३ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. त्यांचा निव्वळ खरेदीदाकडे कल दिसून येतो.

साखर कंपन्यांचे शेअर्स तेजीत, कारण काय?

आज साखर क्षेत्रातील शेअर्स सुमारे १५ टक्क्यांनी वाढले. केंद्र सरकारने साखर कारखान्यांना इथेनॉल उत्पादनासाठी १७ लाख मेट्रिक टन साखर वळविण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतल्याच्या वृत्तानंतर साखर कंपन्यांचे शेअर्स वधारले. स्थानिक बाजारपेठेत पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून इथेनॉल उत्पादनासाठी साखरेचा वापर न करण्याबाबत केंद्राने निर्देश दिले होते. त्यानंतर उसाच्या रसापासून इथेनॉल बनवण्यावरील बंदी उठवण्याचा निर्णय सरकारने घेतला. शनिवारी एक नवीन आदेश जारी करून अन्न मंत्रालयाने सांगितले की, इथेनॉलच्या उत्पादनात उसाचा रस आणि बी-हेवी गुळाचा वापर सुरू राहील. या पार्श्वभूमीवर आज उगार शुगर वर्क्सचे शेअर्स (Ugar Sugar Works Share Price) सुरुवातीच्या व्यवहारात जवळपास १५ टक्क्यांनी वाढले. त्यानंतर दुपारच्या व्यवहारात हा शेअर्स सुमारे ६ टक्के वाढीसह ८५ रुपयांवर होता. त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज, बलरामपूर चिनी, श्री रेणुका शुगर्स, राणा शुगर, द्वारिकेश शुगर आणि Eid Parry हे शेअर्सही ५ टक्क्यांपर्यंत वाढले.

Back to top button