गुलमर्गचे तापमान उणे 2.8; माऊंट अबूचे उणे 1 | पुढारी

गुलमर्गचे तापमान उणे 2.8; माऊंट अबूचे उणे 1

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : डिसेंबर महिना निम्मा झाला असताना उत्तर भारतात बोचरी थंडी पडली आहे. पर्वराजीत मोठ्या प्रमाणावर हिमवर्षाव होत असल्याने त्याचा थेट परिणाम मैदानी भागावर होत आहे. त्यामुळे देशभरातील बहुतांश राज्यांतील तापमान घसरले आहे. जम्मू-काश्मिरातील गुलमर्गमध्ये शनिवारी मोठ्या प्रमाणावर हिमवर्षाव झाल्याने तेथील किमान तापमान उणे 2.8, तर माऊंट अबूचे तापमान उणे 1 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले.

जम्मू-काश्मिरात येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस आणि हिमवर्षाव होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. कमी तापमान झाल्याचा सर्वाधिक फटका मध्यप्रदेशला बसणार असून, याठिकाणी ख्रिसमसपूर्वी आकाशात ढग दाटून आले आहेत. राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून, त्यानंतर अनेक शहरांचे किमान तापमान 12 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राजस्थानमधील अनेक जिल्हांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, कडाक्याची थंडी पडण्याचा अंदाज आहे. माऊंटअबूतील किमान तापमान उणे 1 अंश सेल्सिअस नोंदले गेले, तर दोन दिवसांपूर्वी तेथील पारा शून्य अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. उत्तर प्रदेशातील काही शहरांत किमान तापमान 5 अंश सेल्सिअसच्या खाली होते. बरेली किमान तापमान 4.6 अंश सेल्सिअस, तर अयोध्यातील तापमान 5.5 अंश सेल्सिअस होते. येत्या काही दिवसांत तापमान 1 अंशावर पोहोचण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

कन्याकुमारीत महापूर

तामिळनाडूत आणि केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून, कन्याकुमारीत पावसामुळे महापूर आला असून, लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. लक्षद्वीपच्या काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात मिचाँग चक्रीवादळ आल्याने तामिळनाडूत महापूर आला होता आणि याचा फटका 1.2 कोटी नागरिकांना बसला होता.

Back to top button