श्रीनगर, यूएनआय/पुढारी वृत्तसेवा : पाकिस्तानमधील वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांचे 300 दहशतवादी जम्मू-काश्मिरात घुसखोरी करण्याचा कट करत आहेत. पोलिस ठाणी आणि लष्करी तळांवर हल्ले करण्याची त्यांची योजना आहे. याबाबत माहिती मिळाल्याने लष्कराने संवेदनशील ठिकाणच्या बंदोबस्तात वाढ केली आहे. सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) महानिरीक्षक अशोक यादव यांनी ही माहिती दिली.
संभाव्य घुसखोरीबाबत पत्रकारांना सांगताना यादव म्हणाले की, लाँचपॅडवरून घुसखोरी करण्याचा डाव 300 दहशतवाद्यांनी आखला आहे. बीएसएफ आणि लष्कराच्या जवानांनी संवेदनशील ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. बर्फवृष्टीचे प्रमाण कमी होत असल्यामुळे दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत आहेत. त्यामुळे घुसखोरीचा डाव उधळून लावण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आमचे जवान सीमेवर कडेकोट पहारा देत आहेत.
सीमा भागात सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. काश्मीरमध्ये घातपाताचा कटही दहशतवाद्यांनी आखल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. पोलिस ठाणी आणि लष्करी तळांना टार्गेट करण्याचे कारस्थान दहशतवाद्यांनी रचल्यामुळे अलर्ट जारी करण्यात आला आहे. पीर पंजाल, राजौरी, पूंछ या ठिकाणी दहशतवाद्यांनी हालचाली करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, बीएसएफने पुलवामा या ठिकाणी गरीब आणि विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करून त्यांना मदत पुरविण्यास सुरुवात केली. बीएसएफमध्ये जम्मू-काश्मीरमधील तरुणांची भरती लवकरच करण्यात येणार असल्याचेही यादव यांनी सांगितले.
सहा वर्षांत कारवायांत घट
गेल्या सहा वर्षांत जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये घट झाली आहे. गेल्या वर्षीही घुसखोरी अथवा हल्ल्याच्या सर्वात कमी घटना घडल्या आहेत. केंद्र सरकारने दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. तथापि अलीकडच्या काळात दहशतवादी पुन्हा डोके वर काढत असल्याचे दिसून येत आहे.
83 एमएमचे तोफगोळे आढळले
अखनूर सेक्टरमधील पलानवाला सीमेनजीक स्थानिक नागरिकांना तोफगोळे आढळून आले. त्यानंतर नागरिकांनी त्वरित या घटनेची पोलिसांना खबर दिली. अतिशय काळजीपूर्वक खोदाई करून 83 एमएम क्षमतेचे तोफगोळे बाहेर काढण्यात आले. त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाने हे तोफगोळे निकामी केले.