security breach in parliament: संसदेतील सुरक्षा व्यवस्थेवरून राज्‍यसभेत गदारोळ, ‘तृणमूल’ खासदार ओब्रायन निलंबित | पुढारी

security breach in parliament: संसदेतील सुरक्षा व्यवस्थेवरून राज्‍यसभेत गदारोळ, 'तृणमूल' खासदार ओब्रायन निलंबित

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दाेन तरुणांनी लोकसभेत बुधवारी (दि.१३) घुसखोरी केली. या घटनेचे तीव्र पडसाद आज (दि.१४) संसदेच्‍या दोन्‍ही सभागृहांमध्‍ये उमटले. लोकसभा आणि राज्‍यसभेत विरोधी पक्षांच्‍या सदस्‍यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांना राज्यसभेत गैरवर्तन केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. (security breach in parliament)

राज्‍यसभेत कामकाज सुरु होताच संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींबद्दल विरोधी पक्षांच्‍या सदस्‍यांनी गोंधळ घातला. यावेळी गैरवर्तन केल्‍याप्रकरणी राज्‍यसभा सभापती जगदीप धनखड यांनी तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांना उर्वरित सत्रासाठी निलंबित करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. (security breach in parliament)

security breach in parliament: अत्‍यंत दुर्दैवी घटना : राजनाथ सिंह

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्‍हणाले की, “काल घडलेल्या घटनेचा सर्वांनी निषेध केला आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. लोकसभा अध्यक्षांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. आपल्या सर्व खासदारांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. त्यामुळे संसदेत अराजकता निर्माण करणे योग्य नाही, असे आवाहनही त्‍यांनी केले.

लोकसभेत गदारोळ; कामकाज दुपारी २ पर्यंत तहकूब

बुधवार, १३ डिसेंबर रोजी लोकसभा सभागृह सुरक्षा भंगाच्या  प्रकार घडला. यावर आज विरोधी पक्षाचे खासदार आक्रमक झालेले दिसले. त्यांनी सत्ताधारी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या घटनेवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची देखील मागणी विरोधी  पक्षाच्या नेत्यांनी यावेळी केली. प्रचंड गदारोळ झाला. अखेर लोकसभा अध्यक्षांनी लाेकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केले. (Parliament Winter Session)

आरोपींवर UAPA अंतर्गत विविध गुन्हे दाखल

लोकसभेचं कामकाज सुरू असताना काही तरुणांनी बुधवारी (दि. 13) घुसखोरी करुन  घोषणा देत धुराचे नळकांडे फोडले. या तरुणांवर  संसदेचे सुरक्षा कडे भेदून संसदेत घुसरखोरी केल्‍याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायद्यातील (UAPA ) कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ( Parliament Security Breach ) संसदेच्या सुरक्षेचा भंग, अतिक्रमण, सार्वजनिक कार्यात सार्वजनिक सेवकांना अडथळा आणणे असे विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लोकसभा सचिवालयाकडून सात कर्मचारी निलंबित

संसदेच्‍या हिवाळी अधिवेशनादरम्यान बुधवार, १३ डिसेंबर रोजी तरुणांनी लोकसभेत घुसखोरी केली. संसदेवर 2001 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा 22 वा स्मृती दिन बुधवारी होता. याच दिवशी संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी चव्हाट्यावर आल्या. लोकसभेमध्ये दुपारी एकच्या सुमारास शून्यकाळ सुरू असताना घुसखोरीचा प्रकार घडला. (Parliament Attack) दरम्‍यान, सुरक्षा व्‍यवस्‍थेतील अक्षम्‍य चुकीची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली आहे. लोकसभा सचिवालयाने सात कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयानेही दिले चौकशीचे आदेश

केंद्रीय गृह मंत्रालयानेही संसदेच्‍या सुरक्षा भंग प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. लोकसभा सचिवालयाच्या विनंतीवरून हे आदेश देण्‍यात आले आहेत. अनिश दयाळ सिंग, DG, CRPF यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे, ज्यामध्ये इतर सुरक्षा संस्था आणि तज्ञ सदस्य आहेत,” गृहमंत्रालयाने स्‍पष्‍ट केले आहे.

 

Back to top button