नवी दिल्ली; वृत्तसंस्था : चंद्रावर 2040 पर्यंत अंतराळवीर पाठविणार असल्याची माहिती इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी दिली.
थिरूअनंतपुरम येथे एका दैनिकाला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी भविष्यातील इस्रोच्या विविध मोहिमांची माहिती दिली.
ते म्हणाले की, चांद्रयान 3 मोहीम फत्ते झाल्यानंतर इस्रोचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे आम्ही विविध प्रकल्पांवर काम सुरू केले आहे. चंद्रावर अंतराळवीरांना पाठविणारी मोहीम 2040 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. तत्पूर्वी गगनयानाची तयारी सुरू आहे. या यानातून पृथ्वीच्या कक्षेत चौघा अंतराळवीरांना पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना सुखरूप परत आणण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी भारतीय हवाई दलातील चौघांची निवड करण्यात आली असून त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.
आदित्य एल-1 ही सूर्यमोहीम यशस्वीपणे पार पडली आहे. येत्या पाच वर्षांत या मोहिमेतर्फे सूर्याभोवतीच्या वातावरणाचा अभ्यास केला जाणार आहे. आगामी काळात एसएसएलव्ही, आरएलव्ही, एक्स रे अॅस्ट्रोनॉमी मिशनसह अन्य मोहिमा हाती घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2035 पर्यंत अंतराळात अवकाश स्थानक उभे करण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्याशिवाय मंगळ मोहिमांचेही नियोजन आहे. आगामी काळात भारत अवकाश संशोधनात मोलाची कामगिरी पार पाडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.