

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थान विधानसभा निवडणूक निकालास नऊ दिवसांचा कालावधी लाेटला तरी मुख्यमंत्रीपदाबाबतचा पेच कायम राहिला आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या वसुंधरा राजे आपल्या समर्थक आमदारांना भेटत आहेत. तर दुसरीकडे, आज (दि.११) होणारी विधिमंडळ पक्षाची बैठकही पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही बैठक मंगळवारी (दि.१२) हाेण्याची शक्यता आहे. (Rajasthan New CM News) त्यामुळे राजस्थानचा मुख्यमंत्री कोण, या प्रश्नाच्या उत्तरासाठी राज्यातील जनतेला काही तास वाट पाहावी लागणार आहे.
३ डिसेंबर राेजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. तेव्हापासून राज्यात मुख्यमंत्रीपदी काेण विराजमान हाेणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. छत्तीसगडच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची रविवारी (दि.१०) घोषणा करण्यात आली. विष्णुदेव साई यांच्याकडे राज्याची कमान सोपवण्यात आली आहे. मात्र, राजस्थान आणि मध्य प्रदेशात अद्याप मुख्यमंत्रिपदाचा निर्णय झालेला नाही. सोमवारी (दि.१०) मध्य प्रदेशात विधिमंडळ पक्षाची बैठक होत आहे; पण, राजस्थानमध्ये होणारी बैठक राष्ट्रपतींच्या लखनौ दौऱ्यामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही बैठक मंगळवारी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
राजस्थानमधील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे पुन्हा एकदा आपली ताकद दाखवताना दिसत आहेत. रविवारी (दि.१०) सकाळी दिल्लीहून परतल्यानंतर राजे जयपूर येथील त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्या. दुपारी भाजपचे अनेक आमदार त्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले हाेते. याशिवाय माजी प्रदेशाध्यक्ष अशोक पर्नामी, माजी आमदार प्रल्हाद गुंजाळ, माजी मंत्री राजपालसिंह शेखावत, माजी मंत्री देवीसिंह भाटी यांनीही त्यांची भेट घेतली. राजे दिल्लीहून परतल्यानंतर आणि विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी झालेली ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
दुसरीकडे, रविवारी आमदारांसोबत होणारी निरीक्षकांची बैठक पुढे ढकलण्यात आल्याचीही चर्चा होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सोमवार आणि मंगळवारी लखनऊमध्ये राहणार असल्याने असे सांगण्यात आले. अशा परिस्थितीत लखनौचे खासदार असल्याने राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात राजनाथ सिंह यांची उपस्थितीही प्रस्तावित होती. राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे विधीमंडळ पक्षाची बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे रात्री उशिरा स्पष्ट झाले.
रविवारी वसुंधरा राजे यांची भेट घेणाऱ्यांमध्ये माजी आमदार प्रल्हाद गुंजाळ यांचेही नाव हाेते. गुंजाळ म्हणाले, "राजस्थानची आर्थिक स्थिती बिकट आहे, अशा स्थितीत राज्याचे मुख्यमंत्री अनुभवी हवेत. राजस्थानमध्ये फक्त वसुंधरा राजे या अनुभवी नेत्या आहेत. याची जाणीव राज्यातील जनतेलाही होत आहे. वसुंधरा राजे मुख्यमंत्री व्हाव्यात, अशी माझी आणि राज्यातील जनतेची इच्छा आहे. रविवारी (दि.१०) जयपूरला पोहोचलेल्या केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, लवकरच सकारात्मक आणि नवा संदेश येईल. पक्ष हायकमांड आणि राजस्थानचे सर्व आमदार योग्य वेळी निर्णय घेतील.