2025 मध्ये 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था : गृहमंत्री अमित शहा | पुढारी

2025 मध्ये 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था : गृहमंत्री अमित शहा

डेहराडून; वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने सर्वच क्षेत्रांत गेल्या 10 वर्षांत प्रगती केली असून विकासाचे चक्र वेगवान झाले आहे. याचाच परिणाम म्हणून 2025 च्या अखेरपर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्सची होईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला.

डेहराडूनमध्ये जागतिक गुंतवणूकदार परिषदेत बोलताना अमित शहा यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या लखलखत्या प्रवासाची माहिती गुंतवणूकदारांसमोर मांडली. शहा म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी देश 2047 पर्यंत प्रत्येक क्षेत्रात विकसित झालाच पाहिजे, असे टार्गेट ठेवले आहे. ते गाठण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत. त्यामुळेच आज भारताची अर्थव्यवस्था अतिशय गतिमान वाटचाल करीत आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत 2025 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेसह जगातील तिसरा बलाढ्य देश बनेल यात शंका नाही. गेल्या 75 वर्षांत देशाला आर्थिक आघाडीवर घेता आली नाही एवढी भरारी 2014 पासून घेता आली आहे असेही ते म्हणाले. शहा म्हणाले की, भारताच्या आर्थिक क्षेत्रातील या देदीप्यमान प्रगतीमागे पंतप्रधान मोदी यांचे व्हिजन असून ते केवळ धोरणे आखत नाहीत तर त्याचा पाठपुरावाही सातत्याने घेत असतात. याचमुळे भारताचा विकास झपाट्याने होत असून त्यामुळेच जग भारताकडे आशेने बघत आहे.

साडेतीन लाख कोटींचे एमओयू

दोन दिवस चाललेल्या या जागतिक गुंतवणूकदार परिषदेत उत्तराखंड राज्यात गुंतवणूक करण्यासाठी जगभरातून गुंतवणूक समोर आले आहेत. दोन दिवसांत साडेतीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याबाबत परस्पर सामंजस्य करार झाले असून यामुळे राज्याच्या विकासाची नवी कवाडे उघडली गेल्याचे गृहमंत्री अमित शहा म्हणाले.

Back to top button