मिचाँग चक्रीवादळाचा आंध्र, तामिळनाडूला जोरदार तडाखा | पुढारी

मिचाँग चक्रीवादळाचा आंध्र, तामिळनाडूला जोरदार तडाखा

चेन्नई/हैदराबाद; वृत्तसंस्था : 24 तास आधीपासून तामिळनाडूत धुमाकूळ घालणार्‍या मिचाँग चक्रीवादळाने अखेर मंगळवारी आंध्र प्रदेशात किनारपट्टी ओलांडली असून ताशी 100 कि.मी.पेक्षा वेगाने घुसलेल्या या चक्रीवादळाने आंध्र व तामिळनाडूत प्रचंड मुसळधार पावसाला प्रारंभ झाला आहे. गेल्या 20 तासांपासून सुरू असलेले वादळी वारे व पावसामुळे एक हजारहून अधिक विमाने रद्द करण्यात आली तर 60 हून अधिक रेल्वे धावू शकल्या नाहीत. या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवणार असून विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या अक्राळविक्राळ मिचाँग चक्रीवादळाने मंगळवारी आंध्र प्रदेशच्या किनार्‍यावरील बापतला येथे वादळाने दुपारी दीडच्या सुमारास जमिनीला स्पर्श केला आणि तुफानी वारे घोंघावत पुढे निघाले. सोबतीला प्रचंड पावसाने धुमाकूळ घालायला प्रारंभ केला आहे. बापतलाचा किनारा तामिळनाडूला लागून असून चक्रीवादळ तामिळनाडूच्या किनार्‍यावरूनच पुढे सरकरत तिकडे गेल्याने तामिळनाडूलाही वादळी पावसाचा तडाखा बसला आहे. सध्या 110 किमी वेगाने वारे वाहत असून काही तासांनंतर त्यांची तीव्रता कमी होत जाणार आहे. मात्र वादळाचा परिणाम म्हणून जोराचे वारे व पावसाचा इशारा पुढील 48 तासांसाठी देण्यात आला आहे. या वादळाचा परिणाम तेलंगणा व महाराष्ट्रातही जाणवणार असून तेलंगणात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तर विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तामिळनाडू व आंध्रात एनडीआरएफ, एसडीआरएफ तैनात करण्यात आले आहे. प्रशासन आपत्कालिीन स्थितीसाठी सज्ज झाले आहे.

बापतला आणि आंध्रच्या किनारपट्टी भागात वादळामुळे शेकडो झाडे उन्मळून पडली असून विजेचे खांब आडवे झाले आहेत. झोपड्या व कच्ची घरे भुईसपाट झाले असून किनारपट्टीवरील मच्छीमारांच्या वस्त्यांत मोठी हानी झाली आहे.

चेन्नई पाण्यात

चक्रीवादळ मिचाँगचा सर्वाधिक फटका तामिळनाडूची राजधानी चेन्नईला बसला असून तेथे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यात शेकडो वाहने वाहून गेली, घरांत पहिल्या व दुसर्‍या मजल्यांपर्यंत पाणी घुसले, शेकडो झाडे उन्मळून पडली. अनेक भागात रस्ते मोठ्या प्रमाणात खचले असून प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

विमानसेवेला फटका

चेन्नईच्या विमानतळावरच पाणी घुसल्याने विमानसेवा पूर्णपणे कोलमडली असून एक हजारांहून अधिक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. एकट्या इंडिगोने 550 हून अधिक विमाने रद्द केली. आणखी 24 ते 36 तास विमानसेवा पूर्ववत व्हायला वेळ लागेल, असे विमानतळ प्राधिकरणाने म्हटले आहे.

अभिनेता आमीर खानला बाहेर काढले

आईच्या उपचारासाठी अभिनेता आमीर खान सध्या चेन्नईला स्थलांतरित झाला आहे. त्यालाही जलमय चेन्नईचा फटका बसला. तामिळ अभिनेता विष्णू विशाल याच्या करपक्कम येथील घरी आमीर खान राहतो. गेल्या 24 तासांत वीज, पाण्याविना राहावे लागल्यानंतर विष्णू विशालने मदतीबाबत ट्विट केल्यानंतर एनडीआरएफच्या जवानांनी बोटींच्या मदतीने आमीर खान, विष्णू विशाल आणि बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा यांना सुरक्षितस्थळी पोहोचवले.

Back to top button