लोकसभेच्या सेमी फायनलचा आज निकाल | पुढारी

लोकसभेच्या सेमी फायनलचा आज निकाल

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल म्हणून पाहिल्या जात असलेल्या पाच राज्यांपैकी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड व तेलंगणा या चार राज्यांच्या विधानसभा निवडणूकांची रविवारी मतमोजणी होत असून अवघ्या देशाचे या निकालांकडे लक्ष लागले आहे. एक्झिट पोलच्या निष्कर्षांनुसार राजस्थान आणि मध्य प्रदेशात भाजपच्या विजयाचे संकेत मिळत असले तरी काँग्रेसही दोन्ही राज्यांसह तेलंगणा व छत्तीसगडमध्ये सत्तेत येण्याची खात्री बाळगून आहे.

एक महिन्याच्या निवडणूक प्रक्रियेत राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम व तेलंगणा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. रविवारी या निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. सकाळी 8 वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार असून दुपारी एक वाजेनंतर निकाल यायला प्रारंभ होईल.

सायंकाळपर्यंत या चारही राज्यांतील चित्र स्पष्ट होईल. उत्तर भारतातील आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी भाजपने राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये संपूर्ण ताकद ओतली. भाजपला मध्य प्रदेशात सत्ता राखायची आहे तर राजस्थानात सत्ता काबीज करायची आहे.
उत्तरेतील ही राज्ये भाजपसाठी महत्त्वाची असल्याने तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या सार्‍या बड्या नेत्यांनी प्रचारात झोकून दिले. दुसरीकडे काँग्रेसला राजस्थान राखायचे आहे तर मध्य प्रदेशात सत्ता मिळवायची आहे. त्यामुळे त्यांनीही दोन्ही राज्यांत प्रचार ताकदीने केला. राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांनी या दोन्ही राज्यांत प्रचार केला. छत्तीसगड आणि तेलंगणा ही दोन्ही राज्ये तुलनेने छोटी असली तरी तेथील निकाल महत्त्वाचा आहे. या राज्यांतही भाजप आणि काँग्रेसने पूर्ण ताकदीने प्रचार केला.

या नेत्यांच्या भविष्यांचा फैसला

राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत, उपमुख्यमंत्री सचिन पायलट तर भाजपच्या वसुंधराराजे, गजेंद्रसिंह शेखावत या दिग्गज नेत्यांचा फैसला होणार आहे. हे सारे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जातात. मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, कैलाश विजयवर्गीय, प्रल्हाद पटेल, नरेंद्र तोमर या भाजप नेत्यांच्या भविष्याचा फैसला होणार आहे; तर काँग्रेसचे नेते कमलनाथ यांच्या मतदारसंघाकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या विरोधात त्यांचेच पुतणे उभे असल्याने त्यांच्या निकालाकडे लक्ष असेल तर बघेल यांचे पक्षातील विरोधक सिंगदेव यांच्याकडेही सार्‍यांच्या नजरा आहेत. तेलंगणात मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, त्यांचे चिरंजीव केटीआर, काँग्रेसचे रेवंथ रेड्डी यांच्या भविष्याचा फैसला होणार आहे.

Back to top button