Parliament Winter Session 2023 : सर्वपक्षीय बैठकीत विरोधक आक्रमक | पुढारी

Parliament Winter Session 2023 : सर्वपक्षीय बैठकीत विरोधक आक्रमक

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रीय सुरक्षा, जातनिहाय जनगणना, खासदारांचे निलंबन यासारख्या १४ मुद्यांवरून विरोधी पक्षांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आक्रमक राहण्याचा स्पष्ट इशारा सरकारला आज (दि.२) सर्वपक्षीय बैठकीत दिला. संसदेत सरकार सर्व मुद्यांवर चर्चेसाठी तयार असल्याचे संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्पष्ट केले. ( Parliament Winter Session 2023 )

संसदेचे अधिवेशन सोमवार, ४ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून २२ डिसेंबरला समारोप होईल. संसद अधिवेशनापूर्वी प्रथेप्रमाणे सर्वपक्षीय बैठक सरकारतर्फे बोलावण्यात आली होती. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी बोलावलेल्या या बैठकीत रक्षणमंत्री राजनाथ सिंह (भाजप), सुदीप बंधोपाध्याय (तृणमूल कॉंग्रेस), जयराम रमेश, प्रमोद तिवारी (कॉंग्रेस), राहुल शेवाळे (शिवसेना- शिंदे गट), फौजिया खान (राष्ट्रवादी कॉंग्रेस – शरद पवार गट) यांच्यासह २३ पक्षांचे ३० नेते सहभागी झाले होते. ( Parliament Winter Session 2023 )

संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सरकार सर्व विषयांवर चर्चेला तयार असल्याचे स्पष्ट केले. सोबतच सभागृहतील वातावरण चर्चेला अनुकूल राखण्याची जबाबदारी विरोधकांनी घ्यावी, असे आवाहनही केले. मात्र, या बैठकीमध्ये विरोधकांनी सरकारला संसदेत चर्चा नको असल्याने सरकारकडूनच कामकाजात अडथळे आणले जातात असा आरोप केला. भारतीय भूभागावर चिनी घुसखोरी, महागाई, जातनिहाय जनगणना, ईडी, सीबीआय सारख्या तपास यंत्रणांचा निवडणूकांमध्ये झालेला गैरवापर यासारख्या १४ मुद्यांवर चर्चा हवी असल्याचे कॉंग्रेस नेते प्रमोद तिवारी यांनी स्पष्ट केले.

भारतीय दंड संहितेतील बदलांशी निगडीत तीन कायद्यांची नावे हिंदी सोबतच इंग्रजीतही असावीत, महुआ मोईत्रा, संजय सिंह, राघव चड्डा (आप) या निलंबित खासदारांचे मुलभूत संसदीय हक्क हिरावले जात असल्याचा ठपका ठेवताना निलंबनावरूनही विरोधकांनी नाराजीचा सूर लावला. बहुजन समाज पक्षानेही जातनिहाय जनगणनेची मागणी केली. ( Parliament Winter Session 2023 )

मराठा आरक्षणावर केंद्राने मदत करावी : राहुल शेवाळे

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर महाराष्ट्रातील सरकार तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असताना केंद्र सरकारनेही राज्यसरकारला मदत करावी, असे आवाहन शिवसेना गटनेते राहुल शेवाळे (शिंदे गट) यांनी सर्वपक्षीय बैठकीत केले. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून ओबीसी संघटनाचा विरोध, धनगर संघटनांची आरक्षणाची मागणी यामुळे संवेदनशील परिस्थिती निर्माण झाली आहे. आमदार, खासदारांवर हल्ले झाले असून लोकप्रतिनिधींना आपली कामे करण्यासाठी मतदार संघात जाता येत नाही अशी स्फोटक स्थिती आहे. यावर उपाययोजनांसाठी राज्य सरकार प्रयत्नशील असताना आता केंद्र सरकारनेही राज्याला मदत करावी अशी मागणी बैठकीत केल्याचे राहुल शेवाळे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा भाजपसोबत जाण्याचा निर्णय शरद पवार यांचा होता अशा आशयाच्या अजित पवार यांच्या विधानावरही राहुल शेवाळे यांनी टिप्पणी केली. शरद पवारांचा खरा चेहरा अजित पवार समोर आणत आहेत. त्यामुळे लोकांच्या मनातला शरद पवार यांच्याबद्दचा संभ्रम दूर होत आहे, असा चिमटा शेवाळे यांनी काढला.

संसदेत चर्चेविना महुआ मोईत्रांवर कारवाई नको : तृणमूल कॉंग्रेस

पहिल्यातच दिवशी ‘कॅश फॉर क्वेरी’ प्रकरणात तृणमूल कॉंग्रेसच्या महुआ मोईत्रा यांची चौकशी करणाऱ्या नैतिक आचरण समितीचा अहवाल सादर होणार आहे. यावरून गदारोळ होण्याची चिन्हे आहेत. सुरवातीला महुआ मोईत्रा यांच्यापासून अंतर राखून असलेल्या तृणमूल कॉंग्रेस नेतृत्वाने आता त्यांची पाठराखण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापार्श्वभूमीवर, या पक्षाने आता संसदेत नैतिक आचरण समितीच्या अहवालावर चर्चा झाल्याखेरीज महुआ मोईत्रांवर एकतर्फी कारवाई नको, अशी मागणी सर्वपक्षीय बैठकीत केली.

हेही वाचा :

 

Back to top button