Chennai weather| तामिळनाडूला पावसाने झोडपले; चेन्नईसह अनेक जिल्ह्यांतील शाळा-कॉलेज बंद
पुढारी ऑनलाईन डेस्क : तामिळनाडूमधील चेन्नईसह इतर अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे चेन्नईसह अनेक जिल्ह्यातील शाळा-कॉलेज आज बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच चेन्नईशिवाय तिरुवल्लूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्येही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान आज (दि.३०) देखील वादळ आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. (Chennai weather)
बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे तामिळनाडूच्या चेन्नईमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. शुक्रवारी १ डिसेंबर दरम्यान बंगालच्या उपसागरात ते आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. परिणामी तमिळनाडू, ओडिशा आणि आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. (Chennai weather)
Chennai weather: २ आणि ३ डिसेंबर रोजी ऑरेंज अलर्ट
चेंगलपट्टू आणि कांचीपुरम जिल्ह्यातील शाळाही गुरुवारी बंद राहतील. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने चेन्नई आणि शेजारील जिल्ह्यांमध्ये २ आणि ३ डिसेंबर रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, तिरुवल्लूर, कांचीपुरम, चेन्नई, चेंगलपट्टू, विल्लुपुरम, कुड्डालोर, मायिलादुथुराई, नागापट्टिनम, तिरुवरूर, तंजावर, पुदुकोट्टई, रामनाथपुरम आणि थुथुकुडी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान खात्याने येत्या काही दिवसांत, विशेषत: २ ते ४ डिसेंबर दरम्यान मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. (Tamil Nadu Rainfall)
मदतीसाठी चेन्नई कॉर्पोरेशनकडून हेल्पलाइन सुविधा
बुधवारी तामिळनाडूमधील चेन्नई आणि इतर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने अनेक सखल भागांना झोडपले. सोशल मीडियावर दिसणार्या व्हिज्युअलमध्ये चेन्नई, कांचीपुरम आणि तिरुवल्लूरमधील अनेक रस्ते जवळपास गुडघाभर पाण्याने भरलेले दिसले. सततच्या पावसामुळे चेन्नईतही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पावसामुळे मदतीची गरज असलेल्या लोकांसाठी चेन्नई कॉर्पोरेशनने शहरात हेल्पलाइन क्रमांक सुरू केले आहेत. (Tamil Nadu Rainfall)
५ डिसेंबर रोजी 'मिचॉन्ग' चक्रीवादळ धडकण्याची शक्यता
गेल्या महिन्यात २१ ऑक्टोबर रोजी ईशान्य मान्सून सुरू झाल्यानंतर बंगालच्या उपसागरात 'हमून' चक्रीवादळ तयार झाले आणि ते बांगलादेशकडे सरकले. याच महिन्यात 'मिथिली' चक्रीवादळ बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकले. दोन्ही वादळं पुढे सरकली नसल्याने कोणत्याही ठिकाणी पावसाचीही नोंद झाली नाही. दरम्यान, बंगालच्या उपसागरात सोमवारपासून (दि.२७) नवीन दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे, हे शुक्रवारी १ डिसेंबर रोजी चक्रीवादळात तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढे 'मिचॉन्ग' हे चक्रीवादळ मंगळवारी, ५ डिसेंबर रोजी आंध्रप्रदेश आणि दक्षिण ओडिशा किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आह. त्यामुळे तामिळनाडूत मुसळधार सुरू आहे, असेही हवामान विभागाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

