राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक का लढवली नाही?
नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सप्टेंबर महिन्यात झालेली राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक चुकीची होती, तर त्याविरोधात तेव्हाच दाद का मागितली नाही? हुकूमशाही पद्धतीने पक्ष चालवला, तर राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांविरोधात निवडणूक का लढवली नाही? अजित पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदावर दावा करणे, हे विश्वासघातकी कृत्य आहे, असा जोरदार युक्तिवाद बुधवारी केंद्रीय निवडणूक आयोगापुढे शरद पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबद्दलच्या सुनावणीदरम्यान केला.
अजित पवार यांना पाठिंबा देणार्या सर्व आमदारांवर अपात्रतेची कारवाई सुरू आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात 31 जानेवारीच्या आत निर्णय घेण्यास बजावले आहे, याकडेही युक्तिवादातून लक्ष वेधण्यात आले. पुढील सुनावणी चार डिसेंबरला होणार आहे. शरद पवार गटाचा उर्वरित युक्तिवाद पुढच्या सुनावणीत अभिषेक मनू सिंघवी पूर्ण करणार आहेत. शरद पवार गटाचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर अजित पवार गट आपली बाजू मांडणार आहे.

