Uttarakhand Tunnel Rescue : सिल्कियारा बोगद्याचे सेफ्टी ऑडीट करणार : नितीन गडकरी | पुढारी

Uttarakhand Tunnel Rescue : सिल्कियारा बोगद्याचे सेफ्टी ऑडीट करणार : नितीन गडकरी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Uttarakhand Tunnel Rescue : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तरकाशीतील सिल्कियारा बोगदा दुर्घटनेत अडकलेल्या 41 मजुरांची यशस्वीरित्या सुटका झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. मजुरांचे अडकणे अतिशय गंभीर संकट होते, अशी भावना बोलून दाखविताना या बोगद्याचे सेफ्टी ऑडीट केले जाईल, अशी घोषणाही गडकरी यांनी केली आहे.

तब्बल 17 दिवसांपासून सिल्कियारा बोगद्यामध्ये अडकलेल्या 41 मजुरांची सुटका करण्यात यश मिळाल्याने केंद्र सरकारने सुटकेचा निश्वास टाकला आहे. बोगदा बांधकामाची जबाबदारी हातळणाऱ्या परिवहन खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मिडियावर या सुटका मोहिमेबद्दल प्रतिक्रिया देताना आनंद व्यक्त केला. सोबतच अशा प्रकारचा हा पहिलाच अनुभव असल्याने हिमालयाच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल याची काळजी घेण्यात येईल, असे प्रतिपादन केले. (Uttarakhand Tunnel Rescue)

मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले, की पंतप्रधान कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारच्या सर्व यंत्रणा, उत्तराखंड सरकार आणि स्थानिक जनतेने रात्रंदिवस मेहनत करून वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणी केली हे अतिशय गंभीर संकट होते. हा पहिलाच अनुभव होता. ज्यांचे मजुरांचे प्राण वाचले त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. प्राण वाचविण्यासाठी केंद्र, राज्याच्या यंत्रणा, अभियंत्यांनी जोखीम घेऊन काम केले त्यासाठी या यंत्रणांचे तसेच पंतप्रधान मोदी, उत्तारखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांचे आभार व्यक्त करतो. या घटनेतून बरेच काही शिकायला मिळाले आहे. बोगद्याचे सेफ्टी ऑडिट केले जाईल. हिमालयाची रचना ठिसूळ आहे. त्यामुळे बोगदा बांधताना यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न असेल, असेही गडकरी यांनी सोशल मिडियावरील संदेशात म्हटले आहे. (Uttarakhand Tunnel Rescue)

Back to top button