तेलंगणात केसीआर सरकारला झटका! | पुढारी

तेलंगणात केसीआर सरकारला झटका!

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : तेलंगणा सरकारकडून शेतकर्‍यांसाठी रायथू बंधू योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकर्‍यांना पिकांसाठी आर्थिक मदत केली जाते; पण रायथू बंधू योजनेअंतर्गत रब्बी पिकांसाठी शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या आर्थिक साहाय्याचा हप्ता जमा करण्यास तेलंगणा सरकारला दिलेली परवानगी निवडणूक आयोगाने सोमवारी रद्द केली.

राज्याचे अर्थमंत्री टी. हरीश राव यांनी याबाबतची घोषणा सार्वजनिक केल्याने निवडणूक आयोगाला हा निर्णय घ्यावा लागला. आचारसंहिता काळात मंत्र्यांनी मदतवाटपाची सार्वजनिकरीत्या घोषणा करणे हे नियमांचे उल्लंघन असल्याने नाईलाजास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले. याआधी निवडणूक आयोगाने भारत राष्ट्र समिती सरकारला काही कारणास्तव आचारसंहिता लागू असतानाही हप्त्याचे वाटप करण्याची परवानगी दिली होती. त्याचा निवडणुकीत प्रचार न करण्याबाबतही सांगितले होते. याउपर अर्थमंत्र्यांनी या वाटपाची सार्वजनिक घोषणा केली. सोमवारी पैसे मिळतील, असे ते थेट म्हणाले होते.

रायथू बंधू योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना 10 हजार रुपये वार्षिक मदत केली जाते, हे येथे उल्लेखनीय! मतदानाला अवघे 3 दिवस उरलेले असताना आयोगाचा हा आदेश झाल्याने केसीआर यांना तो मोठा झटका असल्याचे मानले जाते.

Back to top button