Rajouri Encounter : जम्‍मू-काश्‍मीरमधील राजौरीत चकमक सुरुच, जवानांचा परिसराला वेढा | पुढारी

Rajouri Encounter : जम्‍मू-काश्‍मीरमधील राजौरीत चकमक सुरुच, जवानांचा परिसराला वेढा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जम्मू विभागातील राजौरी जिल्ह्यातील धरमसालच्या बाजीमल भागात आज (दि.२३) सलग दुसर्‍या दिवशी चकमक सुरुच राहिली. ( Rajouri Encounter) दरम्‍यान, बुधवार दि. २२ रोजी सुरु झालेली चकमक सायंकाळी सातवाजेपर्यंत सुरु होती. अंधारामुळे चकमक थांबली. मात्र सुरक्षा दलांनी दोन्ही दहशतवाद्यांना घेरले आहे. सध्या दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. सुरक्षा दलाच्‍या जवानांनी परिसराला वेढा दिला असल्‍याची माहिती सूत्रांनी दिली.

राजौरीत बुधवारी नागरिकांना वाचवत असताना सुरक्षा दलांवर दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला.दोन अधिकारी आणि दोन जवानांसह चार जण शहीद झाले होते. कॅप्टन एमव्ही प्रांजल, कॅप्टन शुभम, हवालदार मजीद अशी बलिदान दिलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. शहीद झालेल्‍या एका जवानांची ओळख पटली नव्‍हती. ९ पॅरा येथील मेजर मेहरा यांच्या हाताला आणि छातीला दुखापत झाली आहे. त्यांना विमानाने उधमपूर येथील कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. येथे त्यांची प्रकृती स्थिर आहे. जखमी जवानावर राजौरी येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

बुधवारी सकाळी सुरू झालेली चकमक सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू होती. अंधारामुळे नऊ तासांनंतर गोळीबार थांबवण्यात आला सुरक्षा दलांनी दोन्ही दहशतवाद्यांना घेरले.

रविवारी संध्याकाळी उशिरा या भागात दोन दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफचे जवान चार दिवसांपासून शोध मोहीम राबवत होते. रविवारी संध्याकाळी सुरक्षा दलांना माहिती मिळाली होती की बंदुकांसह दोन संशयित लोक ब्रेवी भागातील एका घरात घुसले आणि रात्रीचे जेवण करून पळून गेले. यानंतर मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू करण्यात आली. या कारवाईत स्निफर डॉग्जशिवाय ड्रोनच्या सहाय्यानेही शोध घेण्यात येत होता. दहशतवाद्यांच्या शोधात सीआरपीएफने आपले कोब्रा कमांडोही तैनात केले होते.

बुधवारी सकाळी सुरक्षा दलांना या भागात घुसलेले दहशतवादी सापडले आणि त्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला जो संध्याकाळी ७ वाजता थांबला. वेढलेल्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी अतिरिक्त लष्करी दलाला पाचारण करण्यात आल्याचे लष्करी सूत्रांनी सांगितले.

 

Back to top button