सवाई माधोपूरचा बालेकिल्ला काँग्रेस राखणार? | पुढारी

सवाई माधोपूरचा बालेकिल्ला काँग्रेस राखणार?

दीपक टांटिया

राजस्थानमधील सवाई माधोपूर मतदारसंघातील निवडणूक भाजपच्या बंडखोर उमेदवार आशा मीणा यांच्या उमेदवारीमुळे लक्षवेधी ठरली आहे. भाजपकडून दिग्गज नेते किरोडीमल मीणा हे मैदानात असून त्यांची लढत काँग्रेसचे गतवेळचे विजेते दानिश अबरार यांच्याशी होत आहे. भाजप बंडखोर आशा मीणा यांना भाजपची मते फोडण्यात यश आले, तर त्याचा थेट फटका किरोडीमल यांना बसणार आहे. दानिश अबरार यांनी गत निवडणुकीत भाजपकडून लढलेल्या आशा मीणा यांचा पराभव केला होता.

भाजपने यावेळी आशा मीणा यांचे तिकीट कापले आणि राज्यसभेचे सदस्य किरोडीमल मीणा यांना संधी दिली आहे. या मतदारसंघातील एकूण मतदारसंख्या 2 लाख 36 हजार 199 इतकी असून गतवेळी अबरार यांनी 25 हजारांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला होता. एकगठ्ठा मुस्लिम मतांबरोबर गुर्जर समाजाची मते त्यावेळी अबरार यांना मिळाली होती. काँग्रेसवर नाराज असलेला गुर्जर समाज यावेळी कोणाच्या बाजूने कौल टाकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संदीप दायमा यांच्यामुळे भाजप अडचणीत…

शीख समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलेल्या संदीप दायमा यांची भाजपने पक्षातून हकालपट्टी केली असली तरी तिजारा मतदारसंघात दायमा हे पक्षाचे अधिकृत उमेदवार बाबा बालकनाथ यांच्यासोबत फिरताना दिसत आहेत. शीख समाजात यामुळे संताप व्यक्त होत असून, हा समाज भाजपविरोधात जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. दायमा यांनी जाहीर सभेत बोलताना मशिद आणि गुरुद्वारासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर शीख समाजात तीव्र पडसाद उमटले होते आणि दायमा यांचे पुतळे जाळण्यात आले होते. दायमा यांनी माफी मागितली होती. मात्र, तरीही वाढता विरोध पाहून भाजपने त्यांना पक्षातून काढून टाकले होते. तिजारा मतदारसंघात शीख समाजाची मोठी लोकसंख्या आहे. अशा स्थितीत ही मते फिरली तर राजस्थानचे योगी आदित्यनाथ म्हणून ओळखल्या जाणार्‍या बाबा बालकनाथ यांना फटका बसू शकतो.

चित्तोडगडमध्ये तिरंगी लढत…

चित्तोडगड जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक होत असली तरी भाजपचे बंडखोर उमेदवार चंद्रभान सिंह यांच्या बंडखोरीमुळे चित्तोडगड शहर मतदारसंघातली निवडणूक सर्वाधिक चुरशीची बनली आहे. या मतदारसंघात राजपूत समाजाची मते मोठ्या प्रमाणात आहेत. भाजपने यावेळी नरपतसिंह राजवी यांना तिकीट दिले असून काँग्रेसकडून सुरेंद्रसिंह जाडावत मैदानात आहेत. एकूण 2 लाख 70 हजार मतदार 25 तारखेला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. भाजपचे राजवी हे माजी उपराष्ट्रपती स्व. भैरोसिंह शेखावत यांचे जावई आहेत. चंद्रभान सिंह यांनी बंडखोरी केल्यानंतर हजारो कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा देत भाजपला रामराम केला होता. नरपतसिंह राजवी यांच्याकडे या मतदारसंघात लादलेले उमेदवार म्हणून पाहिले जात असल्याने त्यांची वाट बिकट बनली आहे. दुसरीकडे चंद्रभान सिंह यांना वाढता पाठिंबा मिळत असल्याने काँग्रेसच्याही चिंतेत भर पडली आहे.

Back to top button