सुवर्णसौधजवळ फाईव्ह स्टार आमदार निवास | पुढारी

सुवर्णसौधजवळ फाईव्ह स्टार आमदार निवास

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : बेळगावजवळ सुवर्णसौधमध्ये दरवर्षी विधिमंडळाचे अधिवेशन भरवण्यात येते. यासाठी उपस्थित राहणार्‍या मंत्री, आमदार, अधिकार्‍यांच्या सोयीसाठी 10 एकर क्षेत्रात पंचतारांकित आमदार निवास उभारण्याचा प्रस्ताव सरकारकडे विचाराधीन आहे. अधिवेशन काळात या निवासामध्ये आमदारांची सोय करायची आणि इतर वेळी त्याचा सगळ्यांसाठीच हॉटेल म्हणून वापर करायचा, असा हा प्रस्ताव आहे. सरकारी-खासगी भागीदारीत ही योजना राबवण्याचा विचार आहे.

अधिवेशन काळात बेळगावला येणार्‍या मंत्री, आमदार, अधिकार्‍यांच्या निवासासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च करावा लागतो. हा खर्च आणि निवासाची होणारी गैरसोय टाळण्यासाठी सरकारकडून हॉटेल उभारण्याचा सरकारकडून विचार सुरू आहे. सुवर्णसौधजवळ 10 एकर सरकारी जागेवर हॉटेलच्या धर्तीवर इमारत बांधण्याचा विचार आहे. सरकारी-खासगी भागीदारीत हा प्रकल्प तयार करण्याचा विचार आहे. इमारतीसाठी जमीन सरकार देणार असून, खासगी व्यक्ती, संस्थेच्या माध्यमातून हॉटेलचे बांधकाम करण्यात येणार आहे. ही इमारत 30 वर्षांसाठी खासगी व्यक्ती-संस्थेला भाडेतत्त्वावर देण्याची योजना असून अधिवेशन काळात या इमारतीचा वापर मंत्री, आमदार, अधिकारी व मान्यवरांच्या निवासासाठी केला जाणार आहे. उर्वरित कालावधीत ते पंचतारांकित हॉटेलच्या स्वरूपात वापरासाठी खुले राहणार आहे. यासाठी अंदाजे 300 कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याची माहिती सूत्राकडून देण्यात आली आहे. सुवर्णसौधचा परिसर 127 एकर विस्तीर्ण असून, बरीच मोठी जागा रिक्त आहे. त्या जागेवर हे हॉटेल उभारले जाऊ शकते.

Back to top button