कोटा, वृत्तसंस्था : इथले मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरसकट म्हणतात की, महिला बलात्काराच्या खोट्या फिर्यादी दाखल करतात. बलात्काराच्या वाढत्या गुन्ह्यांवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे इथले मंत्री (शांती धारीवाल) म्हणतात, मग काय झाले, राजस्थान हा मर्दांचा प्रदेश आहे. महिलांचा असा अवमान काँग्रेसमध्ये केला जातो. दुसरीकडे, भाजपचा महिला सशक्तीकरणावर संपूर्ण विश्वास आहे. महिलांना राजकीय आरक्षण देणारे विधेयक त्यामुळेच भाजपने मंजूर करून घेतलेले आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले.
असली विधाने करून काँग्रेसच्या नेत्यांनी माता-भगिनींच्या संस्कारांवरच काळिमा फासण्याचे काम केलेले आहे. माता-भगिनींनी अशा नेत्यांना त्यांची जागा दाखविली पाहिजे, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले. अंता आणि कोटा येथील दसरा मैदानात त्यांच्या प्रचारसभा झाल्या.
पंतप्रधान म्हणाले, महिलांबद्दल गेहलोत व त्यांचे दरबारी असे का बोलत असावेत, हा प्रश्न मला पडतो; कारण माता-भगिनींच्या सन्मानासाठी स्वत:चे शिर हाती घेऊन रणांगणात उतरण्याची राजस्थानची परंपरा आहे.
काँग्रेसने चंबल रिव्हर फ्रंटमध्ये घोटाळे केल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला. एका गरीब मजुराचा व एका अभियंत्याचा त्यात बळी गेलेला आहे. राजस्थानात भाजपचे सरकार आल्यास त्याची चौकशी केली जाईल, असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.
खासदार दुष्यंत सिंह यांनी फेटा घालून पंतप्रधानांचे स्वागत केले.
जयपुरात मोदींचा भव्य रोड शो
मंगळवारी सायंकाळी जयपूर येथील रोड शोमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 विधानसभा मतदारसंघ साधले. परकोटे येथून हा रोड शो सुरू झाला. राजधानीच्या केंद्रीय भागातील हा रोड शो आदर्शनगर, मालवीयनगर, हवामहल आणि किशनपोल विधानसभा मतदारसंघांतून थेट गेला. सिव्हिल लाईन्स, विद्याधरनगर आणि सांगानेरी मतदारसंघांवरही या रोड शोने परिणाम साधला. सांगानेरी गेट हनुमान मंदिरापासून रोड शो सुरू करण्याचे औचित्य म्हणजे याच भागात दहशतवाद्यांनी एकेकाळी बॉम्बस्फोट घडवून आणले होते.
छोटी चौपड, त्रिपोलिया बाजार, बडी चौपड आणि जौहरी बाजार या साखळी बॉम्बस्फोट झालेल्या भागांचीही रोड शोसाठी मोदींकडून मुद्दाम निवड करण्यात आली. दहशतवाद्यांना आम्ही खुले आव्हान देतो, असा संदेश यातून देण्यात आला. शहरातील 10 विधानसभा मतदारसंघांतील भाजप उमेदवारांनी ठिकठिकाणी पंतप्रधानांचे स्वागत केले. 2018 मध्ये जयपुरातील 5 जागांवर काँग्रेसने विजय मिळविला होता, हेही या रोड शोमागील एक औचित्य होतेच. चार हजार अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी या रोड शोला तैनात होते.
मोदींचे 3 मूड
* प्रसंगकथन : शांती धारीवाल यांनी एका मातेला, एका भगिनीला पैसे देऊन मत खरेदीचा प्रयत्न केला; पण या दोन्ही रणरागिणींनी पैसे तर त्यांच्या तोंडावर फेकून मारलेच… त्यांना पळता भुई थोडी केली. महिलांनी मतदान करतानाही या माता-भगिनीचा कित्ता गिरवावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
* कोटी : सोरसेन गोडावन अभयारण्यात काय झाले, ते तुम्हाला माझ्याहून जास्त चांगल्या प्रकारे माहिती आहे. अवैध खाणकामामागे कोण आहे, तेही तुम्हाला माहिती आहे. मतदानाच्या दिवशी तुम्हाला काय करायचे आहे, तेही तुम्हाला माहिती आहे, अशी कोटी पंतप्रधानांनी केली.
* संताप : राजस्थानात समाजविघातक प्रवृत्ती मोठ्या उत्साहात आहेत. कट्टरपंथीयांकडून हिंदू युवकाचे शिर कापले जाते. दंगलखोरांवर कडक कारवाई अपेक्षित असताना छबडा दंगलीतील आरोपीसाठी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानात रेड कार्पेट अंथरले जाते.