ICC World Cup : राहुल गांधींची PM मोदींवर पातळी सोडून टीका; भाजपने मागितला माफीनामा

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC World Cup : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या पराभवावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. त्यांनी टीम इंडियाच्या पराभवासाठी पंतप्रधान मोदींना जबाबदार धरले. त्यांच्या या विधानाचा भाजपने समाचार घेतला असून पक्षाचे खासदार रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींसाठी वापरलेल्या अपमानास्पद भाषेवर आक्षेप घेत त्यांनी काँग्रेस नेत्याने माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
जिंकणे आणि हरणे हा खेळाचा भाग आहे : रविशंकर प्रसाद
रविशंकर प्रसाद म्हणाले की, जिंकणे किंवा हरणे हा खेळाचा भाग आहे. विश्वचषक फायनंतर (ICC World Cup) पंतप्रधान मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रूम जाऊन खेळाडूंशी संवाद साधला. खेळाडूंना प्रेरित करण्याचा प्रयत्न केला. पण काँग्रेसकडून या घटनेचे राजकारण केले जात आहे. राहुल गांधी हे देशाच्या पंतप्रधानांसाठी अपमानजनक शब्द वापरत आहेत. या विधानाबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे.’
‘राहुलजी भूतकाळातून शिका’
यावेळी रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेस नेत्याला भूतकाळातून शिकण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, तुम्ही भूतकाळातून शिकण्याची गरज आहे. तुमच्या आई सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदींसाठी ‘मौत का सौदागर’ असा शब्दप्रयोग केला होता. त्या टीकेनंतर आज काँग्रेस कुठे आहे ते बघा.’
PM मोदींवर टीका करताना राहुल गांधींची जीभ घसरली
राजस्थान विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहचली असताना राज्यात भाजप आणि काँग्रेसमधील सामना आता अधिक रंगला आहे. आज (दि.२१) राजस्थानमधील प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची जीभ घसरली. राजस्थानच्या जालोर येथे जाहीर सभेत बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घणाघाती टीका केली. ते म्हणाले की, क्रिकेट विश्वचषक स्पर्धा जिंकत होती, पण या अपशकूना (पनौती)मुळे त्यांना हरवले. राहुल गांधी यांच्या भाषणानंतर काँग्रेस पक्षाने आपला अधिकृत सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म X वर याच शब्दांचा वापर करुन पोस्ट केली आहे. ओबीसींची संख्या जास्त आहे; पण केंद्र सरकारला त्यांच्या विकासाची काळजी नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.
आज काँग्रेसने राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. पक्ष पुन्हा सत्तेवर आल्यास राज्याने जनतेसाठी सात शपथा जाहीर केल्या आहेत. जाहीरनाम्यात पंचायत स्तरावर भरती आणि जात जनगणनेसाठी नवीन योजनेचे आश्वासन देण्यात आले आहे.