15 लाख रु., 20 कोटी नोकर्‍यांचे काय : मल्लिकार्जुन खर्गे | पुढारी

15 लाख रु., 20 कोटी नोकर्‍यांचे काय : मल्लिकार्जुन खर्गे

अनुपगड (श्रीगंगानगर); वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना ढीगभर आश्वासने दिली होती. पण एकही पूर्ण केले नाही, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी येथील प्रचार सभेत केली.

अनुपगडमधील पक्षाच्या उमेदवार शिमला नायक यांच्यासाठी ही सभा होती. यावेळी खर्गे म्हणाले की, पंतप्रधान सध्या राजस्थानमध्ये निवडणूक सभा घेत आहेत. मात्र किती आश्वासने पूर्ण केली, याचा हिशेब देत नाहीत. परदेशात दडवलेला काळा पैसा परत आणू आणि प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करू, हे आश्वासन पंतप्रधान मोदी कधी पूर्ण करणार आहेत, असा सवाल खर्गेंनी केला. पंतप्रधान खोटे कसे बोलू शकतात, असे मी म्हणतो तेव्हा तेच मला खोट्यांचे सरदार म्हणून हिणवतात, दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देऊ, असे पंतप्रधान म्हणाले होते.

या हिशेबाने 10 वर्षांत 20 कोटी नोकर्‍या द्यायला हव्या होत्या. पण तसे घडलेले नाही. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट होईल, असेही ते म्हणाले होते. तसेही घडलेले नाही, असे खर्गे यांनी सांगितले.

Back to top button