

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : डेटिंग अॅपद्वारे आपली खोटी कैफियत मांडून गंडा घालण्याचे प्रकार देशात वेगाने वाढत चालले असून सर्वतोपरी खबरदारी घेणे हाच सध्या यावरील उपाय असल्याचे स्पष्ट झाले आहे. एखाद्या व्यक्तीला भेटणे योग्य की अयोग्य हे तपासणे प्रत्येक वापरकर्त्यावर अवलंबून आहे. मात्र, तुम्हाला ऑनलाईन डेटिंग करताना किंवा अॅप वापरताना लैंगिक अत्याचार किंवा हिंसाचाराचा अनुभव येत असेल तर ती तुमची चूक नाही. त्याविरोधात तुम्ही तक्रार दाखल करू शकता.
काही दिवसांपूर्वी बंगळुरात अशीच एक घटना घडली. यात एका खासगी कंपनीत काम करणार्या महिलेला डेटिंग अॅपवरून साडेचार लाख रुपयांना गंडा घालण्यात आला. आपण ब्रिटनमध्ये राहात असून लवकरच भारतात येत असल्याचा बनाव संबंधित व्यक्तीने केला.
त्यामुळे ती महिलाही भाळली. तथापि नंतर आपल्याला एका भामट्याने गंडविल्याचे लक्षात आल्यावर तिने कपाळावर हात मारून घेतला.
– ऑनलाईन कनेक्ट करताना तुमच्या डेटिंग प्रोफाईलसाठी वेगवेगळे फोटो वापरा.
– तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्या व्यक्तीचे कोणतेही बायो, लिंक केलेले सोशल मीडिया खाते नसल्यास आणि फक्त एक फोटो पोस्ट केले असल्यास ते खोटे खाते असू शकते.
– तुमच्याकडे फार कमी माहिती असलेल्या एखाद्या व्यक्तीशी बोलत असाल तर सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे.
– तुम्हाला तुमच्या सोशल मीडियावरील समोरच्या व्यक्तीचे हँडल माहीत असल्यास किंवा तुमचे ऑनलाईन म्युच्युअल मित्र असल्यास तुम्ही त्यांना ओळखूनच त्यांच्याशी बोला. डेटिंग प्रोफाईल तयार करण्यासाठी बनावट सोशल मीडिया खाते वापरून ते तुम्हाला कॅटफिशिंग करत नाहीत ना याची खात्री करा.