फाशीची शिक्षा झालेल्या भारतीय नर्सची याचिका येमेन कोर्टाने फेटाळली | पुढारी

फाशीची शिक्षा झालेल्या भारतीय नर्सची याचिका येमेन कोर्टाने फेटाळली

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : एका व्यक्तीच्या खून प्रकरणात फाशीची शिक्षा झालेल्या निमिषा प्रिया या भारतीय नर्सची आव्हान याचिका येमेनच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. दुसरीकडे, येमेनचे भारताशी सुरळीत संबंध नसल्याने तिच्या फाशीच्या शिक्षेचे संकट टळणार की नाही, याची चिंता सर्वांना भेडसावत आहे.

मूळच्या केरळातील असलेल्या निमिषा प्रिया यांनी 2017 मध्ये एका येमेनी नागरिकाचा खून केल्याचा आरोप आहे. त्यांनी तलाल अब्दो माहदी या व्यक्तीच्या ताब्यातील आपला पासपोर्ट परत मिळवण्यासाठी त्याला घातक इंजेक्शन देऊन मारल्याचा आरोप ठेवण्यात आला. यानंतर तिला तुरुंगात डांबण्यात आले. या खटल्यात तिला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्याविरोधात येमेनच्या सुप्रीम कोर्टात करण्यात आलेले अपीलही फेटाळण्यात आल्याने निमिषाची फाशी अटळ मानली जाते. येमेनच्या कायद्यानुसार जर खून करणार्‍या व्यक्तीने खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला विशिष्ट रक्कम दिल्यास या शिक्षेचे अन्य कमी शिक्षेत परिवर्तन करता येते. यासाठी प्रियाच्या आईने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली.

Back to top button