मध्य प्रदेशात 71 टक्के मतदान | पुढारी

मध्य प्रदेशात 71 टक्के मतदान

भोपाळ/रायपूर, वृत्तसंस्था : मध्य प्रदेश विधानसभेच्या सर्व 230 जागांसाठी शुक्रवारी तब्बल 71 टक्के मतदान झाले. दुसरीकडे, छत्तीसगडमध्ये दुसर्‍या व अंतिम टप्प्यात 70 जागांसाठी 67 टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत झाल्याने या राज्याच्या निकालाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील तीन राज्यांचे मतदान पूर्ण झाले. पहिल्या टप्प्यात 7 तारखेला मिझोराम आणि छत्तीसगड येथे मतदान झाले होते. आज, शुक्रवारी मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या 70 जागांसाठी मतदान झाले.

मध्य प्रदेशातील 230 जागांवर झालेली निवडणूक देशाचे लक्ष वेधून घेणारी आहे. या निवडणुकीत भाजपच्या दिग्गज नेत्यांचे भवितव्य स्पष्ट होणार असून काँग्रेसचीही ताकद नेमकी किती, हे कळून येणार आहे. शुक्रवारी सकाळपासूनच बहुतेक सर्व मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून येत होत्या. महिला आणि तरुणांची संख्या लक्षणीय दिसून आली. दुपारनंतर किंचित कमी झालेले मतदान तीन वाजल्यानंतर पुन्हा झपाट्याने वाढले. तीन वाजेपर्यंत राज्यात सरासरी 31 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर पुन्हा मतदानाने वेग घेतल्याने पाच वाजता मतदान संपले तेव्हा तब्बल 71 टक्के मतदान झाल्याचे समोर आले आहे.

‘या’ नेत्यांची अग्निपरीक्षा

विद्यमान मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान बुधनीमधून, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ छिंदवाडा या पारंपरिक मतदारसंघांतून लढत आहेत. त्यांच्याशिवाय भाजपकडून केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर, प्रल्हाद पटेल, कैलाश विजयवर्गीय हे केंद्रीय नेते उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. या सर्वांच्या निकालासोबतच विद्यमान मंत्री आणि आमदार यांचेही भवितव्य स्पष्ट होणार आहे.

छत्तीसगडमध्ये उत्साह

छत्तीसगडच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानात पहिल्या टप्प्यापेक्षा किंचित कमी मतदान झाल्याचे सांगण्यात आले. एकूण 70 मतदारसंघांत शुक्रवारी मतदान झाले. सकाळचे सत्र आणि शेवटचे सत्र या दोन सत्रांतच मतदानाचे प्रमाण अधिक होते, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत 67 टक्के मतदान झाले.

स्फोटात एका जवानाचा मृत्यू

छत्तीसगडमध्ये दुसर्‍या टप्प्यातही विघ्न आणण्याचा प्रयत्न नक्षल्यांनी केला. गरियाबाद जिल्ह्यात निवडणूक कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी आलेल्या सुरक्षा दलाच्या ताफ्यातील वाहनावर नक्षल्यांनी हल्ला केला. त्यांनी पेरलेल्या एका आयईडीचा स्फोट झाला. त्यात आयटीबीपीचा एक जवान शहीद झाला. हा भाग नक्षलग्रस्त बस्तरनजीकचा असून, ओडिशा सीमेनजीकचा आहे. दुसरीकडे, कांकेर येथे नक्षल्यांनी एका मोबाईल टॉवरला आग लावली. गाटापारा जंगलात मुख्य रस्त्यानजीकच्या जंगलात गस्त घालणार्‍या सुरक्षा दलांच्या पथकाला मोठा शस्त्रसाठा आढळून आला. त्यात तब्बल पाच किलोचे आयईडीही असल्याचे सुरक्षा दलांनी सांगितले. वेळीच ते नष्ट करण्यात आल्याने मतदानावेळी घातपात करण्याचा डाव उधळण्यात आला.

Back to top button