धक्कादायक ! महिलेसह तिच्या ३ मुलांची चाकूने भोसकून हत्या; तपासासाठी ५ विशेष पोलिस पथकांची नेमणूक | पुढारी

धक्कादायक ! महिलेसह तिच्या ३ मुलांची चाकूने भोसकून हत्या; तपासासाठी ५ विशेष पोलिस पथकांची नेमणूक

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : एकाच कुटुंबातील चौघांचा खून झाल्याची घटना रविवारी घडली आहे. महिला आणि तिच्या तीन मुलांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली, तर महिलेची सासू गंभीर जखमी आहे. उडपी येथील केम्मण्णी नेजारी भागात हा प्रका घडला. तपासासाठी पाच विशेष पोलिस पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.

खुन्याचा तपास करण्यासाठी मंगळूर, शिमोगा, कारवारकडे पोलिसांची पथके रवाना झाली आहे. दोन पथके उडपीत तपास करत आहेत.
खुनी हा सुमारे 45 वर्षाचा असून तोंडावर मास्क धारण केला होता. याबाबत व्हिडिओ फुटेज उपलब्ध झाले आहेत. त्याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. खून झालेली एक युवती बंगळूर येथे हवाईसुंदरी म्हणून काम करत होती. कुटुंबप्रमुख नूर महम्मद हे दुबई येथे कामाला आहे. त्यांची पत्नी हसिना (45), मुलगी अघनान (23), अझनान (21), मुलगा असीम (14) यांचा खून करण्यात आला. रविवारी सकाळी ही घटना घडली आहे. कुटुंबातील ज्येष्ठ पुत्र असाद मंगळूर येथील इंडिगो एअरलाईन्समध्ये कार्यरत आहेत. अघनान हवाईसुंदरी म्हणून कार्यरत होती. ती दोन दिवसांपूर्वी बंगळूरहून घरी आली होती. घरात वेगवेगळ्या ठिक़ाणी चौघांचा खून करण्यात आला. हसिना, अझानान, असीम यांना कीचन, बेडरुम, बाथरुममध्ये भोसकण्यात आले. यावेळी बाजूच्या घरातून धावून आलेल्या हसीनाच्या सासूलाही धमकी देण्यात आली. त्या बाथरुममध्ये लपून बसल्याने त्यांचा जीव बचावला.

खुनी ज्यावेळी घरात शिरला त्यावेळी 14 वर्षीय असीम हा घरात नव्हता. तो मित्रासोबत बाहेर गेला होता. तो घरात प्रवेश करण्यासाठी अंगणात येताच त्याला घरातून आवाज ऐकू आला. तो धावतच आत शिरला. खूनी घरात दबा धरुन बसला होता. त्याच्या पोटावर चाकूने वार करून खुनी घरातून फरार झाला.

Back to top button