दिल्लीत 7 वर्षांनंतर नागरिकांनी घेतला चांगल्या हवेत श्वास | पुढारी

दिल्लीत 7 वर्षांनंतर नागरिकांनी घेतला चांगल्या हवेत श्वास

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : दिल्लीकरांनी सुमारे सात वर्षांनंतर दिवाळीत चांगल्या हवेत श्वास घेतला. शहरात रविवारी हवेची गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 202 इतका नोंदवण्यात आला. गेल्या वर्षी दिवाळीतील एक्यूआय 312, 2021 मध्ये 382, 2020 मध्ये 414, 2019 मध्ये 337, 2018 मध्ये 281, 2017 मध्ये 319 आणि 2016 मध्ये 431 एक्यूआयची नोंद करण्यात आली होती.

दिल्लीत 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या पावसानंतर प्रदूषणात सुमारे 50 टक्क्यांनी घट झाली आहे. दिल्लीतील एक्यूआय सलग दोन दिवस 250 पेक्षा कमी आहे. शनिवारी एक्यूआय 219 होता. पावसापूर्वी 9 नोव्हेंबर रोजी दिल्लीचा एक्यूआय 437 नोंदवला गेला. दिवाळीनंतर दिल्लीची हवा पुन्हा खराब होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. दिल्लीच्या आरोग्य विभागाने याबाबत 11 नोव्हेंबर रोजी एक अध्यादेश जारी केला आहे. दिवाळी, विश्वचषक क्रिकेट सामने आणि छट पूजेदरम्यान फटाक्यांवर दिल्ली सरकारने बंदी घातली आहे. सकाळ, सायंकाळी फिरणे, फेर्‍या मारणे अथवा कोणताही व्यायाम करू नये, तसेच बंद जागेत धूम्रपान करू नये, अगरबत्ती जाळू नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे

Back to top button