नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : शरद पवार यांच्या उपस्थितीत सकाळी पुण्यात झालेल्या कौटुंबिक भेटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी तातडीने दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी दाखल झाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क लढवले जात आहेत. जवळपास दीड तास चाललेल्या या भेटीबद्दल भाजपकडून किंवा अजित पवार गटाकडून अधिकृत तपशील देण्यात आला नाही.
मराठा व ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नात केंद्राने हस्तक्षेप करावा, अशी मागणी अजित पवार यांनी केल्याचे सूत्रांकडून समजते. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही एक शिष्टाचार भेट होती, एवढीच माहिती खा. प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट करत दिली. या भेटीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्यासमवेत राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे होते. दीड तास चाललेल्या या भेटीनंतर दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठीची ही भेट होती, अत्यंत चांगली भेट झाली.
अशा आशयाचे ट्विट प्रफुल्ल पटेल यांनी केले. या भेटीत नक्की काय चर्चा झाली, याचा तपशील अजित पवार गटाकडून किंवा भाजपकडून बाहेर आला नसला, तरी गेल्या काही काळात राज्यात घडलेल्या विविध राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याचे समजते.
केंद्राने हस्तक्षेप करावा : अजित पवार
मराठा आरक्षणावरून राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असे चित्र निर्माण झाल्यामुळे आता केंद्र सरकारनेच मराठा आरक्षणासाठी मार्ग काढावा, असे साकडे अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना घातल्याचे समजते. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश केल्यास आमच्यामध्ये हिस्सेकरी वाढतील. त्यामुळे त्याला विरोध करण्याचा इशारा ओबीसी समाजाचे नेते देत आहेत. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी ओबीसींची मागणी मराठा समाजाला मान्य नाही. यावरून भविष्यात राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीतीही आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित संख्याबळ मिळणार नाही, अशी भीती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहा यांच्याकडे व्यक्त केल्याचे समजते.
वकिलांसोबतही बैठक
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत दीड तास चाललेल्या बैठकीनंतर अजित पवार प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी दाखल झाले. तेथे त्यांची वकिलांसोबत बैठक झाली. या बैठकीचा तपशील बाहेर येऊ शकला नाही. मात्र, गुरुवारी निवडणूक आयोगात राष्ट्रवादी पक्षावर ताबा कोणाचा, याबद्दल महत्त्वाची सुनावणी पार पडली. त्यानंतर पहिल्यांदाच अजित पवारांनी वकिलांसोबत बैठक घेतली.