छत्तीसगडमध्ये 70 टक्के मतदान; नक्षल्यांचा गोळीबार | पुढारी

छत्तीसगडमध्ये 70 टक्के मतदान; नक्षल्यांचा गोळीबार

रायपूर; वृत्तसंस्था : छत्तीसगड विधानसभेच्या पहिल्या टप्प्यात मंगळवारी 20 मतदारसंघांत 70 टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. नक्षल प्रभावित बस्तर भागातील या मतदारसंघांतील मतदानाला सुकमा जिल्ह्यात मात्र गालबोट लागले. तेथे नक्षल्यांनी एका मतदान केंद्रावर हल्ला चढवून गोळीबार केला. त्यात तिघेजण जखमी झाले.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम आता निर्णायक टप्प्यावर आला. छत्तीसगडमध्ये 90 पैकी 20 जागांवर, तर मिझोराममधील सर्व 40 जागांवर मंगळवारी मतदान झाले. छत्तीसगडमधील काही घटना वगळता एकूण मतदान शांततेत पार पडले. आज झालेल्या टप्प्यात बस्तर या नक्षल प्रभावित भागातील 12 जागांचा समावेश आहे. एकूण 20 मतदारसंघांत सकाळपासूनच मतदानाला उत्साहात प्रारंभ झाला. सकाळी 9 वाजेपर्यंत बहुतेक सर्व मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्याचे द़ृश्य दिसत होते. नक्षल प्रभावित भाग असल्याने स्थानिक पोलिसांसह निमलष्करी दलाचे जवान बंदोबस्तावर तैनात करण्यात आले होते. दुर्गम भागातून मतदारांचे जथ्थेच्या जथ्थे येत असल्याचे द़ृश्य काही केंद्रांवर पाहायला मिळाले.

दुपारी 3 वाजेपर्यंत बहुतेक सर्व मतदारसंघांत 60 टक्क्यांच्या पुढे मतदान झाले होते. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी 70.87 टक्के झाली होती. सर्वाधिक 79.1 टक्के मतदान भानुप्रतापपूर मतदारसंघात झाले, त्याखालोखाल डोंगरगड, डोंगरगाव, खैरागड, राजनांदगाव येथे 72 ते 77 टक्के मतदान नोंदले गेले.

मतदान केंद्रावर हल्ला

सुकमा जिल्ह्यात कोंटा भागातील बंडा येथील मतदान केंद्रावर मंगळवारी सकाळी 11 वाजता नक्षल्यांनी हल्ला चढवला. त्यांनी मतदारांवर गोळीबार केल्यावर पोलिस व सुरक्षा दलांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. दहा मिनिटांहून अधिक काळ दोन्ही बाजूंनी गोळीबाराच्या फैरी झाडल्या गेल्या. या गोळीबारात तीनजण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या भागातील मतदान केंद्रांवर दुपारी अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली. मात्र, गोळीबाराच्या घटनेनंतर या मतदान केंद्रावर काही काळ मतदानाचे काम ठप्प झाले होते. नक्षल्यांनी नागरिकांना मतदान न करण्याचे आवाहन केले होते; पण ते झुगारून शेकडो मतदार केंद्रांवर रांगा लावून उभे होते.

मिझोराममध्ये 75 टक्के

मिझोराममध्ये विधानसभेच्या 40 जागांसाठी मंगळवारी प्रचंड उत्साहात मतदान झाले. सकाळपासूनच सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळाल्या. सकाळी 11 वाजल्यानंतर मतदानाचा वेग झपाट्याने वाढला. दुपारी 3 वाजेपर्यंत 40 पैकी 34 मतदारसंघांत मतदानाची टक्केवारी 69 टक्के झाली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाने 75 टक्के मतदान झाल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. अंतिम आकडेवारी रात्री उशिरा जाहीर केली जाणार आहे.

Back to top button