पुढारी ऑनलाईन डेस्क : ३५ वर्षीय प्राध्यापक महिलेचे तिच्या विद्यार्थ्याशी प्रेमप्रकरण जुळले. पण या विद्यार्थ्याने लग्नाला नकार दिल्यानंतर या महिलेने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली. पण दिल्ली उच्च न्यायालयाने या विद्यार्थ्याला अटकपूर्व जामीन मंजुर केला आहे.
या विद्यार्थ्याचे वय २० वर्षं आहे. न्यायमूर्ती सौरभ बॅनर्जी म्हणाले, "फिर्यादी महिलेचे वय ३५ वर्षं आहे. ती प्रौढ आहे, आणि तिचे या घटनेतील संशयिताशी प्रेमसंबंध होते. हे संबंध स्वतःच्या मर्जीने होते आणि यात कोणती जबरदस्ती होती, असे दिसत नाही." बार अँड बेंच या वेबसाईटने ही बातमी दिली आहे.
ही एफआयआर फेब्रुवारी २०२२मध्ये दाखल करण्यात आली होती. यात या महिलेने म्हटले होते की दोघांनी मनाली येथे एका मंदिरात लग्न केले, त्यानंतर या तरुणाने भविष्यात कायदेशीरीत्या लग्न करण्याचे वचन दिले. ४ जून २०२२ला या महिलेने या तरुणाच्या कुटुंबीयांची भेट घेतली, आणि त्यांनीही या नात्याला विरोध केला नव्हता. या काळात ही महिला गरोदर राहिली, पण हा तरुण आणि तिचे नातेवाईक यांनी दबावाने गर्भपात करायला भाग पाडले. त्यानंतर जून २०२३मध्ये ही महिला पुन्हा गरोदर राहिली, त्या वेळी या तरुणाने तिच्याकडील अडीच लाख रुपये घेऊन पळ काढला, असे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी महिलेचा पूर्वी घटस्फोट झालेला आहे.
न्यायमूर्ती म्हणाले, "बलात्काराचा गुन्हा, त्याला होणारी शिक्षा असे सगळे मुद्दे या प्रकारच्या गुन्ह्यात लक्षात घेतले पाहिजेत. फिर्यादी महिला ही सर्वसामान्य बुद्धीची आहे, तर या मुलाचे त्या वेळी लग्नाचे वय नव्हते. अशा प्रकारे कमी वयाच्या आपल्याचा विद्यार्थ्याशी नाते ठेवताना त्याचा परिणामांची जाणीवही या महिलेला असली पाहिजे."
हेही वाचा