अन्न प्रक्रिया क्षेत्रात झाली 50 हजार कोटींची गुंतवणूक | पुढारी

अन्न प्रक्रिया क्षेत्रात झाली 50 हजार कोटींची गुंतवणूक

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : अन्न प्रक्रिया उद्योग हे उगवते उद्योग क्षेत्र असून, गेल्या 9 वर्षांत या क्षेत्रात तब्बल 50 हजार कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक झाली आहे. गेल्या 9 वर्षांत प्रक्रिया केलेल्या अन्नाच्या निर्यातीत 150 टक्क्यांनी वाढ झाली असून, देशातील प्रक्रिया क्षमता लक्षणीय वाढली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

वर्ल्ड फूड इंडियाच्या दुसर्‍या सत्राचे भारत मंडपम्मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी पंतप्रधानांनी अन्न प्रक्रिया उद्योगाबाबत भारताने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, केवळ अन्नधान्याचे उत्पादन करून थांबता कामा नये, या हेतूनेच अन्न प्रक्रिया उद्योगाला बळ देण्यात आले. त्याची फळे आता दिसत आहेत. हे एक उगवते उद्योग क्षेत्र असून, त्यात बरेच काही साध्य करता येण्यासारखे आहे. गेल्या 9 वर्षांत या क्षेत्रात तब्बल 50 हजार कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक झाली आहे. गेल्या 9 वर्षांत प्रक्रिया केलेल्या अन्नाच्या निर्यातीत 150 टक्क्यांनी वाढ झाली असून, देशातील प्रक्रिया क्षमता लक्षणीय वाढली आहे.

यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते एक लाख बचत गटांना भांडवली सहाय्य वितरित करण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते फूड स्ट्रीटचेही उद्घाटन करण्यात आले. बचत गटांना देण्यात आलेल्या बीज भांडवल मदतीमुळे या बचत गटांना त्यांच्या उत्पादनांना चांगला दर मिळण्यास तसेच त्यांचे पॅकेजिंग व मालाचा दर्जा उंचावण्यास मदत होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री पशुपती कुमार पारस, केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांचीही भाषणे झाली.

Back to top button