

पुढारी ऑनलाईन डेस्क: तामिळनाडूमध्ये दोन तरुणांना मारहाण करून त्यांना विवस्त्र करत अंगावर लघुशंका केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी थाचनाल्लूर पोलिसांनी मंगळवारी सहा जणांना अटक केली आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत पीडितांच्या तक्रारीच्या आधारे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोन्नुमणी (वय २५) थाझाय्योथुथू येथून अटक केली. नल्लामुथु (वय २१), आयाराम (वय १९), रामर (वय २२). शिवा (वय २२) आणि लक्ष्मणन (वय २२) (सर्वजण रा. तिरुमलालकोझुंथुपुरम) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. याबाबतचे वृत्त एएनआयने दिले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑक्टोबर रोजी पीडित व्यक्ती आणि त्याचा मित्र मणिमूर्तेश्वरम येथे आंघोळीसाठी गेले होते, तेव्हा ही घटना घडली. ते घरी परतत असताना नदीजवळ संशयीत आरोपी दारुच्या नशेत होते. त्यांना थांबवून त्यांचे मूळ ठिकाण आणि त्यांची जात विचारली. त्यानंतर त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. जखमी अवस्थेत तिरुनेलवेली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. पीडितांनी पोलिसांना सांगितले की, जेव्हा त्यांनी आपण दलित वस्तीतील असल्याचे सांगितले तेव्हा नशेत असलेल्या लोकांनी त्यांना मारहाण केली, विवस्त्र केले आणि लघुशंका केली. घटनास्थळावरून पाठलाग करण्यापूर्वी त्यांनी आमच्याकडून ५ हजार रुपये, दोन मोबाईल फोन आणि एटीएम कार्ड घेतले. जवळच असलेल्या नातेवाईकाच्या घरी गेल्यानंतर आम्ही आमच्या घरच्यांशी संपर्क साधला, त्यांनी आम्हाला तिरुनेलवेली मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले, असे एका पीडितेने पोलिसांना सांगितले.