ओवैसींच्या उमेदवारांना भाजपकडून पैसे मिळतात : राहुल गांधी | पुढारी

ओवैसींच्या उमेदवारांना भाजपकडून पैसे मिळतात : राहुल गांधी

हैदराबाद; वृत्तसंस्था : भाजपकडून असदुद्दिन ओवैसींच्या एमआयएम उमेदवारांना पैसे मिळतात, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तेलंगणातील विजयभेरी दौर्‍यात केला. तेलंगणात यावेळी एमआयएम-भाजप-बीआरएसला मिळूनही 2 टक्के मतेदेखील मिळणार नाहीत, असेही राहुल गांधी म्हणाले.

तेलंगणात 19 ऑक्टोबरपासून काँग्रेसची विजयभेरी यात्रा सुरू आहे. या यात्रेंतर्गत बुधवारी कालवकुर्ती येथे त्यांची जाहीर सभा झाली. या सभेत ते बोलत होते. राहुल गांधी म्हणाले, काँग्रेस पक्ष जिथे निवडणूक लढवतो, तिथे एमआयएमकडून हमखास उमेदवार उभा केला जातो. भाजपची फुस त्यामागे आहे. बीआरएस, भाजप आणि एमआयएम हे एकाच माळेचे मणी आहेत. 2 टक्केही मते त्यांना मिळणार नाहीत. तेलंगणात गेल्या 10 वर्षांपासून मुख्यमंत्री के. सी. राव यांच्या रूपात एक राजा आणि त्याचे कुटुंब राज्य करत आहे. कालेश्वरम प्रकल्पाच्या नावाखाली या सरकारने लूट केली आहे. राज्याला कर्जात बुडविले आहे. आमचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास व्यक्त करून त्यानंतर राव यांना जाब विचारला जाईल, असा इशाराही राहुल गांधींनी दिला.

…तर 500 रुपयांत गॅस

काँग्रेसचे सरकार राज्यात सत्तेत आल्यास 500 रुपयांत गॅस सिलिंडर देण्यात येईल, असे आश्वासनही राहुल गांधींनी दिले.

Back to top button