Andhra train accident : लोको पायलटने सिग्नल दुर्लक्षिल्याने 2 गाड्यांची टक्कर | पुढारी

Andhra train accident : लोको पायलटने सिग्नल दुर्लक्षिल्याने 2 गाड्यांची टक्कर

अमरावती; वृत्तसंस्था : आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यात अलमांडा-कंटकपल्ली दरम्यान रविवारी रात्री दोन प्रवासी रेल्वेगाड्यांची टक्कर झाली होती. अपघातात रात्री उशिरापर्यंत या दुर्घटनेत 9 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. सोमवारी सकाळी 4 अत्यवस्थांचा मृत्यू ओढविला. अपघातात 50 वर प्रवासी जखमी झाले असून, शासकीय रुग्णालयांत त्यांना दाखल करण्यात आले आहे.

रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार, विशाखापट्टणम-पलासा प्रवासी रेल्वेगाडीला विशाखापट्टणम-रायगडा प्रवासी रेल्वेगाडीने मागून धडक दिली. अपघात मानवी चुकीमुळे झाल्याचे रेल्वेतील वरिष्ठ अधिकारी विश्वजित साहू यांनी सांगितले. मागून येणार्‍या विशाखापट्टणम-रायगडा गाडीच्या लोको पायलटकडून सिग्नलकडे दुर्लक्ष झाल्याने ही दुर्घटना घडली. धडकेनंतर दोन्ही गाड्यांचे 5 डबे रुळावरून घसरले. तीन डबे हे विशाखापट्टणम-रायगडा गाडीचे, तर दोन डबे विशाखापट्टणम-पलासा गाडीचे होते. सर्व पाचही डब्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

सोमवारी सकाळी बचाव कार्याला आणखी वेग देण्यात आला. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिस आणि बचाव कर्मचारी कार्यरत आहेत. दुर्घटनेनंतर मार्गावरील 12 गाड्या रद्द, तर 7 गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत; अन्य 15 गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत.

केंद्र सरकारकडून 10 लाख रुपयांची भरपाई

मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये, जखमींना 2 लाख रुपये आणि किरकोळ जखमी झाल्यास 50 हजार रुपयांची भरपाई केंद्र सरकारने जाहीर केली. ही माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी कुमार वैष्णव यांनी दिली.

आंध्र प्रदेश सरकारचीही मदत

आंध्र प्रदेश सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपये आणि राज्यातील जखमींना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत देण्याचे
निर्देश मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी दिले.

65 रेल्वे इंजिनांतच आजवर धडकविरोधी सुरक्षाकवच

  • 2022 च्या मे महिन्यात रेल्वे अपघात टाळण्यासाठी रेल्वे इंजिनांना सुरक्षाकवचांनी (दोन इंजिनची धडक टाळणारी यंत्रणा) सुसज्ज करण्याची घोषणा करण्यात आली होती.
  •  19 रेल्वे झोनपैकी केवळ सिकंदराबादमध्येच व तेही वर्षभरानंतर सुरक्षा कवच बसविण्याचे काम सुरू झाले आहे.
  • 13,215 इलेक्ट्रिक लोको इंजिन देशात आहेत.
  • 65 इंजिनमध्येच आजवर सुरक्षाकवच बसवले गेले आहे.
  • 5 हजार कि.मी. मार्गांवर कवच सुरक्षा बसवण्याचे उद्दिष्ट चालू आर्थिक वर्षात ठेवलेले आहे.

Back to top button