अमृतसर; वृत्तसंस्था : अमृतसरनगरी वसवणारे श्री गुरुदास रामदास यांचे प्रकाशपर्व सोमवारी शीख बांधवांनी उत्साहात साजरे केले. यानिमिताने सुवर्ण मंदिर फुलांनी आणि विद्युतरोषणाईने सजवण्यात आले. रविवारी 12 वाजता भाविकांनी आतषबाजी करत गुरू पर्वाला सुरुवात करण्यात आली. प्रकाशपर्व साजरे करण्यासाठी जगभरातून 2 लाख भाविक अमृतसरला पोहोचले. त्यामुळे मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फूलून गेला आहे.
दोन दिवसांपूर्वी मुंबईहून इकबाल सिंह आणि त्यांचे सहकारी अमृतसरला पोहोचले होते. त्यांनी 20 टन देशी आणि विदेशी फुलांनी सुवर्ण मंदिर सजवले. श्री. अकाल तख्त साहिबलाही आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले आहे. सुवर्ण मंदिराच्या मुख्य गाभार्यात जाणारा मार्ग आकर्षक फुलांनी सजवला आहे. संपूर्ण रात्रभर पठण आणि प्रार्थना करण्यात आली. सोमवारी रात्री सुवर्ण मंदिरात आतषबाजी करण्यात आली. पर्यावरणपूरक फटाके फोडण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी पाहण्यासाठी नागरिकांनी मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.