Manipur : मणिपूरमध्ये दहशतवादी हल्ल्यात कर्नल, त्यांची पत्नी आणि मुलासह ४ जवान शहीद | पुढारी

Manipur : मणिपूरमध्ये दहशतवादी हल्ल्यात कर्नल, त्यांची पत्नी आणि मुलासह ४ जवान शहीद

इंफाळ; पुढारी ऑनलाईन

मणिपूरमध्ये (manipur) शनिवारी लष्कराच्या ताफ्याला लक्ष्य करण्यात आले. दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात भारतीय लष्कराचे एक कर्नल, त्यांची पत्नी आणि मुलगा आणि चार जवान शहीद झाले. संरक्षण सूत्रांनी ही माहिती दिली.

हा हल्ला गेल्या काही वर्षांतील सर्वात प्राणघातक हल्ला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी १० वाजता मणिपूरच्या (manipur ) चुराचंदपूर जिल्ह्यात म्यानमार सीमेजवळ ही घटना घडली. ४६ आसाम रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विप्लव त्रिपाठी शनिवारी फॉरवर्ड कॅम्पमध्ये गेले होते आणि परतत असताना त्यांच्या ताफ्यावर हल्ला झाला, अशी माहिती सूत्रांनी दिली.

या हल्ल्यामागे मणिपूरस्थित (manipur ) पीपल्स लिबरेशन आर्मी किंवा पीएलए या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, आतापर्यंत कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी लष्करी अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, दहशतवाद्यांना पकडण्यासाठी काउंटर ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ४६ आसाम रायफल्सच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो. ज्यात कमांडिंग ऑफिसर आणि त्यांच्या कुटुंबासह काही जवान आज मृत्यूमुखी पडले आहेत. राज्य पोलीस आणि निमलष्करी दल दहशतवाद्यांना पकडण्याच्या कामात गुंतले आहेत. दोषींना शिक्षा केली जाईल.

हे ही वाचलं का? 

Back to top button