Madhya Pradesh Assembly Election : मध्यप्रदेशात भाजपच्या स्टार प्रचारकांमध्ये मोदी, शहांसोबत गडकरी, फडणवीसांची जोडी

Madhya Pradesh Assembly Election : मध्यप्रदेशात भाजपच्या स्टार प्रचारकांमध्ये मोदी, शहांसोबत गडकरी, फडणवीसांची जोडी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मध्यप्रदेशात सत्ता राखण्यासाठी कंबर कसलेल्या भाजपने शुक्रवारी (दि.27) आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्यासोबतच केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मराठी नेत्यांनाही प्रचार मोहिमेमध्ये उतरवले जाणार आहे.

40 स्टार स्टार प्रचारकांची यादी जाहीर

मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 40 स्टार स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनाही स्टार प्रचारक बनवण्यात आले आहे. राज्यात उमेदवारी नाकारण्यात आलेले माजी गृहराज्यमंत्री उमाशंकर गुप्ता, दिल्लीचे खासदार असलेले य अभिनेता मनोज तिवारी आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचीही भाजपने स्टार प्रचारक म्हणून नेमणूक केली आहे. भाजपच्या या यादीमध्ये राजनाथ सिंह, वाणिज्य मंत्री पीयुष गोयल, वने व पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर, माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर आदींचाही समावेश आहे.

मराठी भाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी

अर्थात, काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे देखील मध्यप्रदेशात भाजपच्या निवडणूक प्रचार मोहिमेचा प्रमुख चेहरा असतील. परंतु, शिंदे राजघराण्यातील दोन बड्या महिला नेत्या असलेल्या यशोधरा राजे आणि राजस्थान भाजपमधील प्रमुख नेत्या वसुंधरा राजे यांना मात्र मध्य प्रदेशच्या स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान मिळालेले नाही. यशोधरा राजे यांनी स्वत:ला निवडणुकीच्या राजकारणापासून दूर ठेवले आहे. तर, राजस्थानमध्ये वसुंधरा राजे यांचे महत्त्व कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचा मध्य प्रदेशातील स्टार प्रचारकांच्या यादीतही समावेश झाला नसल्याचे मानले जात आहे. परंतु, महाराष्ट्रातील दोन नेत्यांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मात्र मध्यप्रदेशातील मराठी भाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी स्टार प्रचारक बनविले आहे.

हरियाणात भाजपने प्रदेशाध्यक्ष बदलले

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने हरियाणामध्ये प्रदेशाध्यक्ष बदलले आहेत. विद्यमान प्रदेशाध्यक्ष ओमप्रकाश धनकड यांच्या जागी कुरुक्षेत्रचे खासदार नायब सिंग सैनी यांना हरियाणा प्रदेशाध्यक्ष बनविण्यात आले आहे. तर ओमप्रकाश धनकड यांना राष्ट्रीय सचिवपदी बढती देण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निर्णयाची माहिती दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news