Telangana Assembly Election : तेलंगणामध्ये भाजपसमोर संकटाची मालिका | पुढारी

Telangana Assembly Election : तेलंगणामध्ये भाजपसमोर संकटाची मालिका

उमा महेश्वर राव

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत बीआरएस, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र असले तरी हळूहळू भाजप स्पर्धेतून बाहेर पडत असल्याची चर्चा आहे. अवघ्या वर्षभरापूर्वी भाजपमध्ये सामील झालेले माजी आमदार राजगोपाल रेड्डी यांनी काँग्रेसची वाट धरल्याने भाजपला खिंडार पडले आहे. काँग्रेसचे बोंगीरचे खासदार वेंकट रेड्डी यांचे छोटे बंधू असलेल्या राजगोपाल काही काळापूर्वी मुनुगोडे मतदारसंघातून पोटनिवडणुकीत निवडणूक लढवली होती; पण त्यांना बीआरएसचे नेते प्रभाकर रेड्डी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. भाजपने उमेदवारांची जी पहिली यादी जाहीर केली होती, त्यात राजगोपाल रेड्डी यांचे नाव नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या तेलंगण दौर्‍यावेळी राजगोपाल रेड्डी कुठेही दिसले नव्हते. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस रेड्डी यांना तिकीट देणार काय, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
तेलंगणाची स्थापना 2004 साली झाली होती. राज्याच्या पहिल्या आणि त्यानंतरच्या दुसर्‍या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी गजवेल मतदारसंघात विजय मिळवला होता. यावेळीही राव गजवेल मतदारसंघातून निवडणूक लढवित असून त्यांच्यासमोर भाजप नेते एटाला राजेंद्र मैदानात आहेत. गजवेल मतदारसंघ सुरक्षित असल्याची भावना असल्यानेच राव यांनी हा मतदारसंघ निवडला आहे. जनहिताच्या कामांमुळे राज्यात पुन्हा ‘बीआरएस’चे सरकार सत्तेत येण्याचा राव यांचा विश्वास आहे.
 माजी मंत्री जे. कृष्णा राव हे निवडणूक लढवित असलेल्या कोल्लापूर मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी-वढेरा येत्या 31 तारखेला प्रचार करणार आहेत. बीआरएसमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या कृष्णा राव यांनी गत ऑगस्ट महिन्यात काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. प्रियांका यांनी आपल्या मतदारसंघातून प्रचार करावा, अशी विनंती राव यांनी केली होती. त्यानुसार वधेरा त्यांचा प्रचार करणार आहेत. दुसरीकडे वधेरा यांचे बंधू राहुल गांधी यांनी तेलंगणाच्या झंझावाती यात्रा चालविलेल्या आहेत. राज्यातील मेहबूबनगर जिल्ह्यावर काँग्रेसचे विशेष लक्ष असून इथल्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा पक्षाचा निर्धार आहे.

भद्राचलममध्ये अटीतटीची लढत

भद्राचलम मतदारसंघात सध्या तेलुगू देसमचा आमदार आहे. 2018 च्या निवडणुकीवेळी काँग्रेसच्या पोडेम वीरय्या यांनी टीआरएसच्या टी. वेंकट राव यांचा पराभव केला होता. मात्र, नंतर ही जागा रिकामी झाली. तत्पूर्वी, 2014 च्या निवडणुकीत माकपचे उमेदवार एस. राजेय्या यांनी टीडीपीच्या उमेदवाराचा 1815 मतांनी पराभव केला होता.

मुस्लिम मतांवर एमआयएमची भिस्त

वादग्रस्त नेते असदुद्दीन ओवैसी यांचे तेलंगणा हे गृहराज्य आहे. राजधानी हैदराबाद आणि त्याच्या आजुबाजुच्या परिसरात ओवेसी यांचा दबदबा आहे. राज्यातील सुमारे 13 टक्के मुस्लिम मतांवर ओवैसी यांची भिस्त आहे. याआधीच्या दोन विधानसभा निवडणुकांचा विचार केला तर मुस्लिम मतदारांचा सर्वाधिक कल के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस आणि ओवैसी यांच्या ‘एमआयएम’ कडे राहिला असल्याचे दिसून येते. यावेळी काँग्रेसची राज्यात मोठी हवा आहे. त्यामुळे मुस्लिम मतदार कोणत्या बाजूने झुकणार, ते पाहण्यासारखे ठरणार आहे. कर्नाटक निवडणुकीत 90 टक्के मुस्लिम मतदारांनी काँग्रेसच्या बाजूने एकहाती मतदान केले होते. ओवैसी यांच्यामुळे तेलंगणामध्ये असे होणे शक्य नाही. मात्र, ओवैसी यांनी जास्त मते खेचली तर त्याचा फटका बीआरएस आणि काँग्रेसलाच बसणार आहे.

Back to top button