Assembly Elections : निवडणुकीनंतर इंडिया आघाडीचा फॉर्म्युला ठरणार

Assembly Elections : निवडणुकीनंतर इंडिया आघाडीचा फॉर्म्युला ठरणार

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांमध्ये भाजपविरुद्ध एकत्रितपणे निवडणूक लढविण्याच्या धोरणात मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत झालेल्या वादावादीनंतर या सगळ्या बाबींचा आगामी लोकसभा निवडणुकीवर काहीही परिणाम होणार नसल्याचे इंडिया आघाडीतील सूत्रांनी सांगितले.

मध्य प्रदेशात जागावाटपात काँग्रेस आणि समाजवादी पक्षातील वादामुळे इंडिया आघाडीत व आघाडीबाबत जे जे म्हणून गैरसमज निर्माण झाले होते, ते दूर झाले आहेत. सप प्रमुख अखिलेश यादव यांनी काही कठोर विधाने केली होती. सपचा हेकेखोरपणा, आम आदमी पक्षाच्या हट्टावर काँग्रेसने कठोर भूमिका घेतली. राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षांची एकजुटीवर मात्र त्याचा काही परिणाम होणार नाही. भाजपविरोधात लोकसभेत विरोधी पक्षाचा एक प्रबळ उमेदवार उतरवण्याबाबत सर्वसंमतीपुरता एकच विषय इंडिया आघाडीत उरलेला आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. ज्या राज्यात इंडिया आघाडीतील ज्या पक्षाची स्थिती मजबूत आहे, त्या राज्यात चालकाच्या जागेवर तोच पक्ष बसेल आणि उरलेले सगळे पक्ष त्याचा मार्ग सुकर कसा होईल, त्याचा प्रयत्न करतील, असे ठरल्याचेही सांगण्यात आले.

समन्वय समिती बैठक

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात इंडियाची समन्वय समितीची बैठक होईल. यात आघाडीतील वरिष्ठ नेते हजेरी देतील. प्रचार समितीकडून संयुक्त सभांची रूपरेषा तयार करण्यात येत आहे. पाटणा, नागपूर, कोलकाता आणि चेन्नईला संयुक्त सभा होतील. समन्वय समितीची एकच बैठक अद्याप झाली आहे. ऑक्टोबरअखेरपर्यंत एखादा फॉर्म्युला ठरेल, असे त्यावेळी सांगण्यात आलेले असले तरी 5 राज्यांत विधानसभा निवडणुकांच्या घोषणेनंतर काँग्रेसने त्याला स्वल्पविराम दिला आहे.

केरळ 20, बंगाल 42, पंजाब 13 आणि दिल्ली 7 अशा जागा वाटपासाठी कठीण ठरल्या आहेत. त्यावर सर्वांत शेवटी निर्णय होईल. केरळमध्ये गुंतागुंत अधिक आहे. बंगालमध्ये काँग्रेस आणि तृणमूलमध्येही तिढा आहेच. पंजाब आणि दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पक्षात सहमतीसाठी अडचणी येतील. या 4 राज्यांत लोकसभेच्या 82 जागा आहेत.

महाराष्ट्र, यूपी, बिहार, तामिळनाडूत प्रदेश कार्यकारिणी घेणार निर्णय

लोकसभेच्या 270 जागांवर काँग्रेस चालकाच्या सीटवर बसेल. उर्वरित 270 जागांवर आघाडीतील घटकपक्षांमध्ये चालकाच्या जागेचे वितरण होईल. महाराष्ट्र 48, बिहार 40, तामिळनाडू 39 आणि उत्तर प्रदेश 80 या जागा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे, द्रमुक, जदयू, राजद आण सप मिळून भाजपविरोधात लढतील. या 4 राज्यांत लोकसभेच्या एकूण 197 जागा आहेत. इंडिया आघाडीतील या घटक पक्षांच्या प्रदेश कार्यकारिणी जागावाटपाबाबतचा निर्णय घेतील.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news