Telangana Assembly Election : तिरंगी लढतीत ‘बीआरएस’चे मोठे आव्हान | पुढारी

Telangana Assembly Election : तिरंगी लढतीत ‘बीआरएस’चे मोठे आव्हान

उमा महेश्वर राव

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वात शेवटी 30 नोव्हेंबरला तेलंगणासाठी मतदान होणार आहे. सत्ताधारी भारत राष्ट्र समिती (बीआरएस), काँग्रेस आणि भाजप अशी तिहेरी लढत राज्यात अपेक्षित असली, तरी बहुतांश मतदारसंघांत बीआरएस विरुद्ध काँग्रेस असेच प्राथमिक चित्र आहे. मागील पाच वर्षांच्या कालावधीत राबविलेल्या जनहिताच्या असंख्य योजना, स्थानिक पातळीपर्यंत कार्यरत असलेले कार्यकर्ते याचा फायदा उठविण्याचा ‘बीआरएस’चा प्रयत्न आहे. दुसरीकडे कर्नाटक पाठोपाठ तेलंगणा काबीज करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे.
तेलंगणाची स्थापना झाल्यापासून या राज्यावर के. चंद्रशेखर राव यांच्या ‘बीआरएस’ चा दबदबा आहे. विविध कारणांमुळे हे सरकार चर्चेत असले, तरी विकासाच्या राबविलेल्या विविध योजनांमुळे सरकारची लोकप्रियता अजून टिकून आहे. सलग तिसर्‍यांदा सरकार स्थापन करण्यासाठी ‘बीआरएस’ने प्रचारात कोणतीही कसर सोडलेली नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने 119 वॉर रूम्सची स्थापना केलेली आहे. थोडक्यात प्रत्येक मतदारसंघामध्ये पक्षाचा वॉर रूम कार्यरत आहे. दुसरी बाब म्हणजे प्रत्येक शंभर मतदारांमागे एक इन्चार्ज नियुक्त करण्यात आला आहे. मतदारांनी मतदानादिवशी घराबाहेर पडून केवळ ‘बीआरएस’साठीच मतदान करावे, ही जबाबदारी या इन्चार्जकडे देण्यात आलेली आहे.
राज्यात आपला खरा विरोधक काँग्रेस असल्याची ‘बीआरएस’ला जाणीव आहे. दोनेक वर्षांपूर्वी तेलंगणामध्ये असलेली भाजपची हवा कमी झाली आहे. भाजप स्पर्धेतून बाहेर पडला, तर दुहेरी लढती होतील आणि सत्ताविरोधी लाटेचा फटका ‘बीआरएस’ला बसू शकतो, असे मानणारा एक मोठा वर्ग आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीवेळी तसेच त्यानंतरच्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणूक वेळच्या चुका टाळण्याचा ‘बीआरएस’चा आटोकाट प्रयत्न आहे. निवडणुकीच्या दोन महिने आधीच झालेली उमेदवारांची घोषणा हा त्याचा एक भाग आहे. ‘बीआरएस’च्या उमेदवारांनी प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. काँग्रेस आणि भाजपकडून उमेदवार घोषित होण्याआधीच ‘बीआरएस’चे उमेदवार घराघरांपर्यंत पोहोचले आहेत, विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांचा विचार केला, तर बीआरएसने 90 आमदारांचे तिकीट कायम ठेवले आहे. उमेदवार बदलण्यात आल्याने जो धोका उद्भवतो, तो टाळण्याचा प्रयत्न पक्षाने केला आहे.
बीआरएस ही भाजपची बी-टीम असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी तेलंगणा दौर्‍यावेळी केला होता. यावर चंद्रशेखर राव आणि त्यांच्या कन्या के. कविता यांनी सडकून टीका केली होती. राहुल गांधी यांना कोणी फारसे गंभीरतेने घेत नाही, असे सांगतानाच विधानसभा निवडणुकीत 95 ते 100 जागा मिळण्याचा विश्वास कविता यांनी व्यक्त केला होता. हा विश्वास किती सार्थ ठरणार, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. रयत बंधू, रयत बीमा यासारख्या योजनांच्या माध्यमातून शेतकर्‍यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न भारत राष्ट्र समितीने केला आहे. त्याला तोड म्हणून शेतकर्‍यांना जास्त मदतीच्या योजना आणल्या जातील, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे.
पूर्वाश्रमीचे ‘बीआरएस’ नेते एटाला राजेंद्र यांना भाजपने दोन मतदारसंघांत तिकीट दिले आहे. त्यात मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव लढत असलेल्या गजवेल मतदारसंघाचा समावेश आहे. बंडी संजय कुमार यांना करिमनगर, सोयाम बापू राव यांना बोथ तर अरविंद धर्मापुरी यांना कोरुथला मतदारसंघात तिकीट देण्यात आले आहे. तेलंगणामध्ये भाजपचे चार खासदार आहेत, त्यात केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांचा समावेश आहे. रेड्डी यांचे नाव पहिल्या यादीत सामील नाही. जी. किशन रेड्डी यांच्याकडे भाजपने तेलंगणाची जबाबदारी दिली आहे. त्यांचा करिष्मा कितपत चालणार हे लवकरच दिसून येईल.

Back to top button