पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र आणि गोवा दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र आणि गोवा दौऱ्यावर

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (दि. २६) महाराष्ट्र आणि गोवा दौऱ्यावर येणार आहेत. महाराष्ट्र दौऱ्यात पंतप्रधानांच्या हस्ते सुमारे ७५०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण, पायाभरणी आणि उद्घाटन होईल. तर गोवा येथे ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांना उद्यापासून सुरवात होत आहे. या स्पर्धांचे उद्घाटन पंतप्रधान मोदी करतील.

पंतप्रधान कार्यालयातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या गोव्यात ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन होणार आहे. गोव्यातील मडगाव मधील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे उद्घाटनाचा सोहळा रंगणार असून यात पंतप्रधान मोदी क्रीडास्पर्धांमधील सहभागी खेळाडूंशी संवाद साधतील. गोव्यामध्ये प्रथमच राष्ट्रीय क्रीडास्पर्धा होत आहेत. या स्पर्धा २६ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये देशभरातील १० हजारहून अधिक खेळाडू ४३ क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होणार आहेत.

तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते उद्या दुपारी एकच्या सुमारास शिर्डी येथील साईबाबा मंदिरात पुजा होईल. तसेच मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटन करण्यात येईल. शिर्डी येथील नवीन दर्शन रांग संकुल म्हणजे एक वैशिष्ट्यपूर्ण आणि अत्याधुनिक अशी भव्य इमारत असून येथे दर्शनासाठी आलेल्या भक्तांसाठी आरामदायी प्रतिक्षालय बांधण्यात आले आहे. दहा हजारांहून अधिक भाविकांच्या एकत्रित आसनक्षमतेसह या इमारतीत अनेक सुसज्ज प्रतिक्षालये आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते ऑक्टोबर २०१८ मध्ये या दर्शन रांग संकुलाची पायाभरणी झाली होती. त्यानंतर दुपारी दोनला निळवंडे धरणाचे जल पूजन आणि धरणाच्या डाव्या कालव्याचे लोकार्पण होईल. निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे जाळे ८५ किलोमीटर क्षेत्रात विस्तारलेले असून नगर जिल्ह्यातील सहा आणि नाशिक जिल्ह्यातील १ अशा सात तालुक्यांमधील १८२ गावांना याचा थेट लाभ मिळणार आहे. दुपारी सव्वातीनला पंतप्रधान मोदी शिर्डी येथे सार्वजनिक सभेत सहभागी होणार असून यादरम्यान आरोग्य, रेल्वे, रस्ते, तेल आणि वायू अशा विविध क्षेत्रातील सुमारे ७५०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण, पायाभरणी आणि उदघाटन त्यांच्या हस्ते होईल.

पंतप्रधानांच्या हस्ते अहमदनगर शासकीय रुग्णालयामधील आयुष हॉस्पिटलसह अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण होईल. यावेळी माता आणि बाल आरोग्य विभागाची पायाभरणी देखील होणार असून या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते लाभार्थ्यांना आयुषमान कार्ड आणि स्वामित्व कार्डाचे वाटप होईल. कुर्डुवाडी-लातूर मार्ग या १८६ किलोमीटर रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण, जळगाव ते भुसावळला जोडणारा तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग (२४.४६ किलोमीटर), राष्ट्रीय महामार्ग १६६ च्या सांगली ते बोरगाव विभागाचे चौपदरीकरण; इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मनमाड टर्मिनलवर अतिरिक्त सुविधा यासारख्या प्रकल्पांचेही उद्घाटन पंतप्रधानंच्या हस्ते होईल. यासोबतच ८६ लाख शेतकऱ्यांसाठी फायदेशीर 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे' उदघाटन देखील पंतप्रधान करतील. या योजनेमुळे महाराष्ट्रातील प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या ८६ लाख लाभार्थ्यांना दरवर्षी ६००० रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news