BJP Star Campaigners : पंतप्रधान मोदींसोबत गडकरी, फडणवीससुद्धा स्टार प्रचारक | पुढारी

BJP Star Campaigners : पंतप्रधान मोदींसोबत गडकरी, फडणवीससुद्धा स्टार प्रचारक

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : BJP Star Campaigners : देशात नोव्हेंबर महिन्यात होत असलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांची रंगत आता वाढू लागली आहे. यात महाराष्ट्रातुन केंद्रात मंत्री असलेले नितीन गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह प्रचारात उतरणार आहेत. दरम्यान काँग्रेसने आपल्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर केल्याचे समजते.

भाजपने छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आपल्या स्टार प्रचारकांची यादी घोषित केली आहे. या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ४० प्रचाराकांची नावे जाहीर करण्यात आले आहेत. ४० स्टार प्रचाराकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंग, नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे. दरम्यान, मिझोरमसाठी देखील ४० स्टार प्रचारकांची यादी भाजपने जाहिर केली आहे. निवडणुका असलेल्या पाच राज्यांपैकी मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि मिझोरम मधील बहुतांश उमेदवारांची घोषणा भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.

काँग्रेसने मिझोरम विधानसभा निवडणुकीसाठी आपली यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. यात काँग्रेसच्या प्रचाराची भिस्त प्रामुख्याने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यावर असणार आहे. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे सोनिया गांधी प्रचारात सहभागी होऊ शकतील का? याबाबत अद्याप स्पष्टता नाही. सोबतच मध्यप्रदेशमध्ये माजी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष कमलनाथ, माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग तर राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे प्रचारक असणार आहेत. छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भुपेश बघेल आणि उपमुख्यमंत्री टी. एस. सिंगदेव तर तेलंगणामध्ये प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी आणि मिझोरममध्ये प्रदेशाध्यक्ष लालसावता हे प्रमुख प्रचारक असणार आहेत. मात्र यापैकी काही राज्यांमध्ये पक्षात दोन गटात अंतर्गत सुप्तसंघर्ष आहे. काहीवेळा तो उफाळूनही आला आहे.

दरम्यान, भाजप नेत्या आणि महाराष्ट्राच्या माजी मंत्री पंकजा मुंडे मध्यप्रदेश भाजपच्या सहप्रभारी आहेत, भाजपच्या पक्षसंघटनेत त्या राष्ट्रीय सचिव आहेत. मात्र पक्षाकडून त्यांना स्टार प्रचारकांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले नाही. महाराष्ट्रातून केंद्रात राज्यमंत्री असलेल्या डॉ. भारती पवार यांनाही यात संधी दिलेली नाही. दुसरीकडे काँग्रेस पक्ष मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये महाराष्ट्रातील नेत्यांचा स्टार प्रचारकांमध्ये समावेश करण्याची शक्यता आहे. छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांची सीमा महाराष्ट्राला लागून आहे. त्यामुळे काँग्रेस महाराष्ट्रातील विशेषतः सीमावर्ती भागाजवळील आपल्या नेत्यांना प्रचाराला पाठवण्याची शक्यता आहे.

Back to top button