Mizoram Assembly Polls: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून १२ उमेदवारांची घोषणा | पुढारी

Mizoram Assembly Polls: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून १२ उमेदवारांची घोषणा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: भारतीय जनता पक्षाने मिझोरम विधानसभा निवडणुकीसाठी १२ उमेदवारांची यादी घोषित केली आहे. यापैकी सर्व १२ मतदारसंघ अनुसुचित जमातीसाठी राखीव आहेत. भाजपने जाहीर केलेल्या १२ उमेदवारांमध्ये मिझोरमचे प्रदेशाध्यक्ष वनलाल हमुअका यांना डंपा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. मिझोरम विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि मिझो नॅशनल फ्रंटला रामराम ठोकून भाजपमध्ये दाखल झालेले लालरिनियाना सेलो यांना मामीत मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. (Mizoram Assembly Polls)

विधानसभेच्या एकूण ४० जागा असलेल्या मिझोरममध्ये ३९ जागा अनुसुचित जमातीसाठी राखीव आहेत. मिझोरममध्ये मंगळवारी (दि.१७) काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा पार पडली. त्याच्या बरोबर एक दिवसानंतर भाजपने आपली यादी जाहीर केली आहे. (Mizoram Assembly Polls)

७ नोव्हेंबरला मिझोरममध्ये मतदान पार पडणार आहे. गेल्या निवडणुकीत स्थानिक प्रादेशिक पक्ष असलेल्या मिझो नॅशनल फ्रंटला २६, काँग्रेसला ५ तर भाजपला १ तर अपक्षांना ८ जागा मिळाल्या होत्या.

Mizoram Assembly Polls : छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीत एक उमेदवारी घोषित

दरम्यान, छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीत भाजपने आणखी १ उमेदवारी घोषित केली आहे. पंडरीया मतदारसंघातून भावना बोहरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यात भाजपने याआधी पहिल्या यादीत २१ तर दुसऱ्या यादीत ६४ उमेदवारांची घोषणा केली आहे.

हेही वाचा 

Back to top button