आठ संवेदनशील ठिकाणी किरणोत्सार शोधक यंत्रणा बसवणार | पुढारी

आठ संवेदनशील ठिकाणी किरणोत्सार शोधक यंत्रणा बसवणार

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जगभरात सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. युक्रेन आणि रशिया युद्ध सुरूच आहे. त्यातच इस्रायल आणि ‘हमास’मधील युद्धाचा भडका उडाला आहे. अशातच पाकिस्तान, बांगला देश, नेपाळ आणि म्यानमारमधून किरणोत्सारी साहित्याची तस्करी होण्याच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने सीमेवरील 8 संवेदनशील ठिकाणी रेडिएशन डिटेक्शन इक्विपमेंट अर्थात किरणोत्सार शोधक यंत्रणा (आरडीई) बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

या यंत्रणेच्या माध्यमातून सीमेजवळ कोणत्याही प्रकारचा किरणोत्सारी पदार्थ सापडल्यास तो तत्काळ ओळखता येणार आहे. किरणोत्सारी साहित्याचा वापर आण्विक शस्त्रांच्या निर्मितीसाठी केला जाण्याचा धोका आहे, त्यामुळे त्या साहित्याची तपासणी करणे गरजेचे असल्याचे भारतीय अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. सीमेवरील ज्या आठ ठिकाणी ‘आरडीई’ उपकरण बसवले जाणार आहे, तेथून सीमेपलीकडील लोकांची मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू असते. केंद्र सरकारने गेल्यावर्षीच ‘आरडीई’ उपकरण बसवण्यासाठी मंजुरी दिली होती. या उपकरणाची ज्या कंपनीला ऑर्डर दिली होती, ती कंपनी हे उपकरण बसवण्याचे काम लवकरच सुरू करणार असल्याचे या प्रकल्पावर काम करणार्‍या एका अधिकार्‍याने सांगितले आहे.

या ठिकाणी उभारणार यंत्रणा

अटारी (पाकिस्तान सीमा), पेट्रापोल, आगरतळा, डवकी आणि सुतारकांडी (सर्व बांगला देश सीमा), रक्सौल आणि जोगबानी (नेपाळ) आणि मोरेह (म्यानमार) च्या चेक पोस्टवर ‘आरडीई’ उपकरण बसवले जाणार आहे.

Back to top button