Supreme Court : चक्क डार्विन आणि आईन्स्टाईनच्या सिद्धांतांना कोर्टात आव्हान, सुप्रीम कोर्टाने केली चंपी | पुढारी

Supreme Court : चक्क डार्विन आणि आईन्स्टाईनच्या सिद्धांतांना कोर्टात आव्हान, सुप्रीम कोर्टाने केली चंपी

पुढारी ऑनलाईन डेस्क : सर्वोच्च न्यायालयात विविध प्रकारच्या जनहितार्थ याचिका दररोज दाखल होत असतात. यातील अनेक याचिका समाजहिताच्या असतात, तर काही याचिका मात्र निव्वळ कोर्टाचा वेळ वाया घालवणाऱ्या असतात. अशीच एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. यात याचिकाकर्त्याने चक्क डार्विन यांचा उत्पत्तीचा सिद्धांत आणि आईन्स्टाईन यांचा सापेक्षतावादाचा सिद्धांत यांनाच आव्हान देणारी याचिका दाखल केली होती.

राजकुमार नावाच्या एका व्यक्तीने ही याचिका दाखल केली होती. राजकुमार यांचे म्हणणे असे होते की, त्यांनी शाळेत डार्विन आणि आइन्साटाईन यांच्या सिंद्धांताचा अभ्यास केला होता. पण हे दोन्ही सिद्धांत चुकीचे असून ते शाळेत शिकवले जाऊ नयेत.

न्यायमूर्ती संजय किशन कौल, सुधांशू धुलिया यांच्या पीठासमोर ही याचिका सुनावणीसाठी होती. न्यायमूर्तींनी ही याचिका फेटाळली. न्यायमूर्ती म्हणाले, ‘एक काम करा, तुम्ही पुन्हा शिक्षण घ्या आणि स्वतःचा सिद्धांत लिहा. शिकण्यापासून आम्ही कोणाला रोखत नाही. याचिका रद्द करत आहोत.’

शास्त्रीय सिद्धांतांना आव्हान देणाऱ्या याचिका कोर्टात दाखल करता येणार नाहीत, असे ही न्यायमूर्तींनी सुनावले. ‘घटनेतील कलम 32 नुसार अशा प्रकारे शास्त्रीय सिद्धांतांना आव्हान देता येणार नाही. जर तुम्हाला हे सिद्धांत चुकीचे वाटत असतील तर त्यात न्यायालय काय करू शकते आणि यातून तुमच्या मूलभूत हक्कांचा भंग कसा काय होऊ शकतो?’असा सवालही न्यायमूर्तींनी केला.

Back to top button