‘पीएफआय’ला दणका, ‘एनआयए’चे ६ राज्यांत छापे | पुढारी

'पीएफआय'ला दणका, ‘एनआयए’चे ६ राज्यांत छापे

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बुधवारी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, तामिळनाडूसह महाराष्ट्रात छापे घातले. ‘पीएफआय’ (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) या कट्टरवादी मुस्लिमांच्या संघटनेविरोधात ही कारवाई करण्यात आली. दहशतवादी कारवाया तसेच घातक कट रचत असल्याच्या आरोपावरून 6 राज्यांत 12 ठिकाणी एकाचवेळी ही कारवाई करण्यात आली.

विक्रोळीतील शिक्षक अब्दुल वाहिद शेख याच्या घरीही छापे घालण्यात आलेे. ठाण्यातील राबोडी परिसरातील सईद नरेकर याच्या घरी छापे टाकून त्याचीही चौकशी करण्यात आली. तपास पथकांनी नवी मुंबई आणि मुंब्रा परिसरातही शोधमोहीम राबवली.

दहशतवादातील सहभागावरून ‘पीएफआय’ संघटनेवर गेल्यावर्षी बंदी घालण्यात आली होती. याउपर संघटनेतील स्लिपर सेलच्या कारवाया सुरूच असल्याची माहिती ‘एनआयए’ला उपलब्ध झाली. त्यावरून ‘एनआयए’च्या पथकांनी रात्री उशिरा राजस्थानच्या टोंक, कोटा, गंगापूर येथे छापे टाकले व अनेक संशयितांना अटक केली. ‘एनआयए’चे पथक दिल्लीतील बल्लीमारन भागातही धडकले.
कानपुरात डॉक्टर ताब्यात यूपीतील लखनौ, बाराबंकी, कानपूर, सीतापूर आणि हरदोईत छापे पडले. कानपुरातून डॉ. अबरार अहमद याला ताब्यात घेण्यात आले आहे. लखनौत 3 घरांवर छापे पडले. भदोहीत एका मौलवीच्या घरातून आक्षेपार्ह कागदपत्रे ‘एनआयए’ला उपलब्ध झाली आहेत.

लखनौतही डॉक्टरवर छापा

लखनौत डॉ. शमीम, ख्वाजा यांच्यासह एकूण 3 जणांच्या घरांची झडती घेण्यात आली. मोहल्ला सर्व बाजूंनी सील करण्यात आला होता.
भदोहीतही एका मौलवीच्या घरातून काही सिम कार्ड व कागदपत्रे ‘एनआयए’ने ताब्यात घेतली आहेत.
गेल्यावर्षी 27 सप्टेंबर रोजी केंद्र सरकारने ‘पीएफआय’ आणि संबंधित 8 संघटनांवर 5 वर्षांसाठी बंदी घातली होती.
‘पीएफआय’ने बँकिंग चॅनल, हवाला आणि देणग्यांच्या माध्यमातून भारतासह परदेशातून निधी जमवून तो विभागून विविध बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केला होता. या पैशांचा वापर ‘पीएफआय’कडून गुन्हेगारी, बेकायदा आणि दहशतवादी कारवायांसाठी होत होता. त्याचे तपशीलवार पुरावे सरकारकडे उपलब्ध झाल्याने ‘यूएपीए’अंतर्गत बंदीची कारवाई करण्यात आली होती. भारतात अनेक मुस्लिमेतरांच्या हत्याही ‘पीएफआय’ने घडवून आणल्या होत्या. सुरुवातीला केवळ दक्षिण भारतात सक्रिय असलेल्या या संघटनेने यूपी, बिहार, महाराष्ट्रासह 23 राज्यांमध्ये आपले जाळे पसरविले होते. बंदीनंतरही संघटनेच्या कारवाया सुरू असल्याने मध्यवर्ती तपास यंत्रणा सतर्क आहेत.

Back to top button