बालासोर रेल्वे अपघातातील 28 मृतदेह बेवारस | पुढारी

बालासोर रेल्वे अपघातातील 28 मृतदेह बेवारस

भुवनेश्वर, वृत्तसंस्था : ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बाहानगामध्ये झालेल्या अपघातातील 28 अज्ञात प्रवाशांचे मृतदेह बेवारस ठरवण्यात आले आहेत. आता त्यांच्यातील काहींवर सोमवारी विधिवत अंत्यसंस्कार झाले, तर अन्य लोकांवर मंगळवारी अंत्यसंस्कार होणार आहेत. भुवनेश्वर महानगपालिकेने याबाबतची कायदेशीर प्रक्रिया रविवारी पूर्ण केली.

2 जून रोजी झालेल्या बालासोर रेल्वे दुर्घटनेनंतर अज्ञात प्रवाशांचे मृतदेह भुवनेश्वरमधील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) ठेवण्यात आले होते. एकूण 81 मृतदेहांचे 110 जण दावेदार होते. डीएनए चाचणीनंतर 51 मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आले आहेत. उर्वरित 28 मृतदेहांचे कोणीच नातेवाईकसमोर आले नसल्याने या मृतदेहांना बेवारस म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती एम्सच्या अधिकार्‍यांनी दिली. या मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी 25 ऑगस्ट रोजी सीबीआयने खुर्दाच्या जिल्हाधिकार्‍यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर 7 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकार्‍यांकडून पत्र मिळाल्यानंतर महापालिकेने बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरू केली होती.

Back to top button