सिक्कीमच्या चीन सीमेवरील स्थिती नियंत्रणात | पुढारी

सिक्कीमच्या चीन सीमेवरील स्थिती नियंत्रणात

गंगटोक, वृत्तसंस्था : उत्तर सिक्कीममध्ये ढगफुटी होऊन तिस्ता नदीला आलेल्या महापुराने हाहाकार उडला आहे. मुसळधार पाऊस आणि महापुराने आतापर्यंत 30 जणांचा बळी गेला आहे, तर अनेक लोक बेपत्ता झाले आहेत.

बचावपथकाकडून लोकांना सुरक्षितस्थळी हलवले जात आहे. याचदरम्यान भारतीय लष्कराकडून सिक्कीम सेक्टरमध्ये चीन लगतच्या प्रत्यक्ष (एलएसी) नियंत्रण रेषेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. महापुरामुळे एलएसीवरील लष्कराच्या हालचाली आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर कोणत्याही प्रकारचा परिणाम झाला नसून स्थिती नियंत्रणात असल्याचे भारतीय लष्कराच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

सीमेच्या सुरक्षेसाठी उच्च दर्जाची तयारी ठेवली असून, महापुराचा फटका बसलेल्या ठिकाणी शोध, बचाव मोहीम सुरूच ठेवली आहे. तसेच दूरसंचार आणि अन्य पायाभूत सुविधांची पुननिर्मितीवर लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी लष्करासह अन्य यंत्रणांची मदत घेतली जात असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. याचदरम्यान सिक्कीममध्ये अडकलेले 26 विद्यार्थी शिलांगमध्ये पोहोचले असून त्यांचे फोटो एक्सवर (ट्विटर) शेअर केले आहेत. विद्यार्थ्यांना सुरक्षित राज्यात आणल्याबद्दल अधिकार्‍यांचे आभार मानतो, अशी पोस्ट मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी एक्सवर केली आहे.

Back to top button