पुढारी ऑनलाईन डेस्क : सत्तेत असलेल्या राज्यात काँग्रेस सरकार कोणत्याही परिस्थिती जातीनिहाय जनगणना करेल, अशी माहिती काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज (दि.९) दिली. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आज मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाली. दरम्यान, काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) बैठक AICC कार्यालयात झाली आहे. यानंतर माध्यमांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, जातीनिहाय जनगणना या मुद्यांवर आमची चार तास चर्चा झाली. यासंदर्भात काँग्रेस कार्यकारिणीने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. जातीनिहाय जनगणनेला सर्वांनी एकमुखाने पाठिंबा दिला. काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थान, कर्नाटक, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश राज्यांतही जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी नमूद केले.
'इंडिया' आघाडीतील सर्व पक्ष जातीनिहाय जनगणनेला पाठिंबा देतील का, असा सवाल यावेळी राहुल गांधींना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत आम्ही ठरवले आहे की जात जनगणना लागू करू. एवढेच नाही तर आम्ही भाजपची सत्ता असणार्या राज्यांमध्येही जातीनिहाय जनगणनेसाठॅ दबाव आणण्याचा निर्णय घेतला आहे. देशाला जातीची जनगणना हवी आहे. 'इंडिया' आघाडीतील अनेक पक्ष या निर्णयाला पाठिंबा देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कोणाची मते थोडी वेगळी असू शकतात. ही आमच्यासाठी अडचण नाही. पण जास्तीत जास्त पक्ष या निर्णयाला पाठिंबा देतील, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.
"भारताच्या भवितव्यासाठी जात जनगणना आवश्यक आहे. जात जनगणनेनंतर विकासाचा नवा मार्ग खुला होईल. हे काम पूर्ण करूनच काँग्रेस पक्ष निघून जाईल. आज दोन भारत निर्माण होत आहेत. एक अदानींसाठी, दुसरा प्रत्येकासाठी. त्यामुळे जातीनिहाय जनगणनेनंतर आम्ही आर्थिक सर्वेक्षणही करू, असेही राहुल गांधींनी स्पष्ट केले.