निवडणूक आयोगासमोर आज राष्ट्रवादी निवडणूक चिन्ह सुनावणी

NCP vs NCP crisis
NCP vs NCP crisis

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील फुटीनंतर पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत अजित पवार गट तसेच शरद पवार गटाचे परस्परविरोधी दावे या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगासमोर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. दरम्यान, आपापल्या दाव्यांच्या समर्थनार्थ दोन्हीही गटांनी आयोगाकडे प्रतिज्ञापत्र देखील सादर केले आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगात उद्या दुपारी तीनच्या सुमारास ही सुनावणी सुरू होणार असल्याचे कळते. यासाठी आयोगासमोर शरद पवार गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ आणि काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी युक्तिवाद करणार आहेत. यामध्ये अजित पवार गटातर्फे निवडणूक आयोगाकडे ४७ हजार शपथपत्रे सादर झाल्याची तसेच शरद पवार गटाने ५१ हजार शपथपत्रे सादर केल्याची माहिती आहे. यासोबतच २६ राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांची प्रतिज्ञापत्रे देखील शरद पवार गटाकडून आयोगाला सादर केली जाऊ शकतात.

दरम्यान, या सुनावणीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अजित पवार यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहून त्यावर उत्तर सादर करण्यात आल्याचे शरद पवार गटाच्या सूत्रांनी सांगितले. यामध्ये अजित पवार यांच्याकडून दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ६० प्रतिज्ञापत्रे सरकारी कर्मचाऱ्यांची तर ९८ प्रतिज्ञापत्रे शैक्षणिक संस्थेच्या कर्मचाऱ्यांची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवर आपलाच हक्क असल्याचे शरद पवार गटाचे म्हणणे असून यासाठी मागील वर्षी दिल्लीत तालकटोरा स्टेडियममध्ये झालेल्या कार्यकारिणी बैठकीत पक्षाध्यक्षपदी शरद पवार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली होती आणि या निवडणुकीत पक्षाध्यक्षपदासाठी शरद पवार यांच्या नावाच्या प्रस्तावकांमध्ये छगन भुजबळ, सुनील तटकरे, अजित पवार आणि धनंजय मुंडे यांचा समावेश होता

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news