रामविलास पासवान, गोगोई यांना मरणोत्तर ‘पद्मभूषण’ सन्मान | पुढारी

रामविलास पासवान, गोगोई यांना मरणोत्तर ‘पद्मभूषण’ सन्मान

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मंगळवारी राष्ट्रपती भवनात आयोजित भव्य सोहळ्यात 2021 मधील ‘पद्म’ पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवास, आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई तसेच गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी राष्ट्रपतींनी 4 पद्मविभूषण, 5 पद्मभूषण तसेच 44 पद्मश्री पुरस्कारांनी विविध क्षेत्रांतील व्यक्‍तींना सन्मानित केले. पार्श्‍वगायक एस. पी. बालसुब्रह्मण्यम यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बालसुब्रह्मण्यम यांच्या मुलाने पुरस्कार स्वीकारला. शिवाय, गायिका के. एस. चित्रा यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कोरोना महारोगराईच्या पार्श्‍वभूमीवर दोन भागांत पुरस्कार वितरण करण्यात आले. पहिल्या टप्प्यात पुरातत्त्वशास्त्रज्ञ बी. बी. लाल, कार्डियोलॉजिस्ट बेले मोनप्पा हेगडे (वैद्यकीय), नरिंदर सिंह कपानी यांना विज्ञान आणि अभियंता क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी मरणोत्तर तसेच मूर्तिकार सुदर्शन साहू यांना कला क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिवाय, माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सर्वात कमी वयात, 19 व्या वर्षी भारतीय बास्केटबॉल संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणारी खेळाडू पी.अनिता यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. कर्नाटकच्या पॅरा-अ‍ॅथलिट के. वाय. व्यंकटेश यांना पद्मश्री पुरस्कारने गौरविण्यात आले. त्यांनी जगभरात विक्रमी पदकांची कमाई केली आहे. यासह लडाखचे समाजसेवक चुंतलिम चोंजोर यांना पद्मश्री पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. कारगिलमधील दोन अतिदुर्गम गावांना जोडण्यासाठी त्यांनी स्वत: 38 किलोमीटरचा रस्ता तयार केला आहे.

कर्नाटक जनपद अकादमीच्या पहिल्या तृतीयपंथी अध्यक्ष मंजम्मा जोगाठी यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतातील सर्वात प्रसिद्ध प्रशिक्षक म्हणून ओळख असलेले ओम नांबियार यांनी मरणोत्तर पद्मश्री पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. धावपटू पी. टी. उषा यांना त्यांनी प्रशिक्षण दिले होते. राष्ट्रपतींच्या हस्ते नांबियार यांच्या पत्नीना पुरस्कार प्रदान करण्यात आला. टेबल टेनिसपटू मौमा दास यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आले. पैलवान वीरेंद्र सिंह यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Back to top button